या मंदिरामध्ये आजही अश्वत्थामा करतात शिवपूजा.

temple
प्राचीन काळामध्ये अस्तित्वात असलेले भृग्नपूर आताच्या काळामध्ये मध्य प्रदेश राज्यातील बुऱ्हाणपूर म्हणून ओळखले जाते. महाभारताच्या काळापासून हे शहर अस्तित्वात असल्याची साक्ष देणाऱ्या काही खुणा आजही या ठिकाणी पहावयास मिळतात. बुऱ्हाणपुराच्या जिल्हा मुख्यालयापासून साधारण बावीस किलोमीटरच्या अंतरावर असीरगढ किल्ला उभा आहे. या किल्ल्यावर पाच हजार वर्षांच्याही पूर्वीचे शिवमंदिर आहे. या मंदिराला असीरेश्वर मंदिर म्हटले जाते. या मंदिराच्या बद्दल सर्वमान्य आख्यायिका अशी, की या प्राचीन मंदिरामध्ये आज ही साक्षात अश्वत्थामा शिवपूजा करण्यासाठी दररोज येत असल्याचे म्हटले जाते. ही आख्यायिका अनेकांना अचंब्यात टाकणारी असली, तरी स्थानिक रहिवाश्यांच्या मान्यतेनुसार अश्वत्थामा करीत असलेया नित्यपूजेची परंपरा गेली अनेक शतके सुरु आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये असलेल्या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मध्य प्रदेश व्यतिरिक्त इतर अनेक प्रांतांमधून भाविक अगत्याने येत असतात.
temple1
असीरेश्वर मंदिर महाभारतकालीन असल्याची मान्यता असून, येथे शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. या ठिकाणी बुऱ्हाणपुरातील अनेक भाविक खाद्यांवर कावड घेऊनही पदयात्रा करीत दर्शनाला येतात आणि मंदिरामध्ये शिव शंकराला अभिषेक करतात. श्रावण महिन्याखेरीज महाशिवरात्रीला देखील या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते.

या मंदिराशी निगडित आख्यायिकेच्या बाबतीत बोलायचे झाले, तर द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याने आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी आपले अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भाच्या दिशेने रोखले असता, त्याच्या या कृत्यामुळे कोपाविष्ट झालेल्या कृष्णाने त्याला कधीच मुक्ती मिळणार आणि युगानुयुगे तो भटकत राहील असा शाप दिला. तेव्हापासून या मंदिराच्या परिसरामध्ये अश्वत्थामा दिसत असल्याची आख्यायिका असून, दररोज पहाटे स्वतः अश्वत्थामा या मंदिरामध्ये येऊन शिवाची नित्यपूजा करीत असल्याचे म्हटले जाते. अनेक इतिहासकार, शोधकर्ते, शास्त्रज्ञ, तसेच पॅरानॉर्मल एक्स्पर्ट्सनी या मंदिरामध्ये येऊन या आख्यायिकेची सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला, पण हे रहस्य आजतागायत कोणालाच उलगडले नाही.
temple3
काही तज्ञांनी या आख्यायिकेची पडताळणी करण्यासाठी केलेल्या एका प्रयोगामध्ये मंदिराची सगळीकडून कसून पाहणी केली असून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य द्वाराच्या शिवाय इतर कोणत्याही मार्गाने प्रवेश करता येणे शक्य नसल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर या तज्ञमंडळींच्या उपस्थितीमध्येच संध्याकाळची आरती संपल्यानंतर पुजाऱ्याने मंदिरामध्ये झाडलोट करून मंदिराची स्वच्छता केली आणि रात्री मंदिराच्या मुख्य द्वाराला कुलूपही घातले. तज्ञांच्या समाधानासाठी मंदिराच्या कुलुपाची किल्ली त्याने तज्ञांच्या हवाली केली. तज्ञांच्या टीमने सर्व घटनेचे व्हिडियो चित्रीकरण करण्याचे ठरविले असल्याने मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि मंदिराच्या आसपास अनेक कॅमेरे लावण्यात आले होते.
temple4
तज्ञांची टीम रात्रभर जागरण करीत मंदिराच्या परिसरातच मुक्काम करून होती. काय पहावयास मिळेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने झोप येणे केवळ अशक्य झाले होते. पाहता पाहता रात्र सरली आणि पहाटे मंदिराचे पुजारी मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यास आले. त्यांनी सर्व तज्ञांच्या टीमसमोर मंदिराचे द्वार उघडले आणि सर्वांनी एकाच वेळी आत प्रवेश केला. मंदिराच्या गर्भगृहामध्ये पोहोचल्यावर त्यांना जे दिसले, ते पाहून सर्वच जण चकित झाले. मंदिराच्या शिवलिंगाची नुकतीच पूजा झालेली स्पष्ट दिसत होती. शिवलिंगाला जलाभिषेक झाल्याने ते ओलसर होते आणि त्यावर ताजी फुलेही वाहिलेली होती. फुलांच्या सोबत गुलालही वाहिलेला होता. मंदिराच्या आसपास लावलेल्या कॅमेर्यांच्या फुटेजमध्ये काही विशेष आढळले नाही. त्यामुळे मंदिर जर बंद होते, तर ही पूजा कोण करते ही आजही न उलगडलेले रहस्य होऊन बसले आहे. भाविकांच्या मान्यतेनुसार अश्वत्थामा तापी नदीमध्ये स्नान करून गुप्त रस्त्याने या मंदिरामध्ये येऊन पूजा करतात. ही आख्यायिका कितपत सत्य आहे हे कोणी सांगू शकत नसले, तरी दररोज सकाळी केली जाणारी ही पूजा मात्र स्तिमित करणारा अनुभव आहे हे मात्र नक्की.

Leave a Comment