या दुकानामधील फर्निचर झपाटलेले !

furniture
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलीना येथील ‘हॅबिटाट फॉर ह्यूमॅनिटी’ संस्थेचे रोवन काऊंटीमधील ‘री-स्टोअर’ हे दुकान येथे मिळणाऱ्या अनेक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. मुख्यतः यामध्ये वापरलेले गेलेले, म्हणजे उत्तम स्थितीतील ‘सेकंड हँड’ फर्निचर रास्त किंमतीमध्ये उपलब्ध असते. या विक्रीतून मिळणारे उत्पन्न ‘री-स्टोअर’च्या वतीने गरजूंना दिले जाते. पण अलीकडेच ‘री-स्टोअर’ने आपल्या दुकानामध्ये एक फलक लावलेला नागरिकांच्या पाहण्यात आला असून, त्यावर या दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या फर्निचर पैकी काही वस्तूंची निवड काळजीपूर्वक आणि स्वतःच्या जबाबदारीवर करण्यासंबंधी ग्राहकांना सूचित करण्यात आले आहे. यामध्ये एक ड्रॉअर्सचा सेट (chest of drawers), आणि एक ‘कॅनपी’ ( कापडी छत ) असलेला पलंग, या वस्तूंच्या किंमती खूपच जास्त असून, या वस्तूंच्या मूळ मालकाने या वस्तू काही खास कारणास्तव विकण्यास काढल्या असल्याचेही सूचित केले गेले होते.
furniture1
याबाबतीतची हकीकत अशी, की मूळ मालकाच्या घरामध्ये या वस्तू आल्यापासून त्याच्या घरामध्ये चित्रविचित्र घटना घडू लागल्या होत्या. पलंगावर झोपल्यानंतर त्याच्या पत्नीला सतत भयावह स्वप्ने पडत असत, इतकेच नाही, तर या मालकाचे पाळीव कुत्रे देखील या वस्तूंकडे पाहून सतत गुरगुरत, भुंकत असत. सुरुवातीला या मालकाला आणि त्याच्या पत्नीला, असे का घडते आहे हे समजत नव्हते. पण काही काळाने आपले कुत्रे केवळ याच वस्तूंकडे टक लावून पाहतात आणि भुंकतात, तसेच या वस्तूंच्या संपर्कात आल्यानंतरच आपल्याला विचित्र अनुभव येत असून, भयावह स्वप्नही पडत असल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या वस्तू घरातून तातडीने बाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला.
furniture2
री-स्टोअर मधून विकल्या जाणाऱ्या वस्तूंचे मिळालेले पैसे गरजूंना दिले जात असल्याने या वस्तूंच्या विक्रीमागे स्टोअर मालकाला नफा कमाविण्यासाठी या वस्तूंची विक्री करण्याची घाई नव्हती. त्याचबरोबर जे कोणी या वस्तू खरेदी करेल, त्याला या वस्तूंची पार्श्वभूमी माहिती असावी या करिता स्टोअरच्या मालकाने या वस्तूंची माहिती सांगणारा फलक दुकानामध्ये लावला असल्याचे म्हटले आहे. मात्र झपाटलेल्या वस्तू, किंवा एखाद्या ठिकाणाबद्दलच्या कथा कानी पडल्या की ज्याप्रमाणे काही लोक त्यापासून लांब राहणे पसंत करतात त्याचप्रमाणे त्या किंवदंती पडताळून पाहण्याचा उत्साह देखील अनेक हौशी मंडळींना असतो. री-स्टोअरमधील या फर्निचरची कथा ऐकूनही एका उत्साही दाम्पत्याने याच वस्तू एक हजार डॉलर्सची रक्कम देऊन खरेदी केल्या असून, अजून तरी त्यांना काही विचित्र अनुभव आले नसल्याचे समजते.

Leave a Comment