मेक्सिको मध्ये संशोधकांनी बनविले ‘ओन्ली नोज’ मास्क

करोना बचावासाठी मास्क ही अत्यावश्यक चीज आहे हे सत्य असले तरी या मास्क मुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागते हेही सत्य आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी म्हणजे हॉटेल, रेस्टोरंट, खाण्याची अन्य ठिकाणे येथे काही खायचे, प्यायचे असेल तर मास्क काढून ठेवावा लागतो आणि करोना संसर्गाचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून मेक्सिको येथील संशोधकांनी एक नवीन मास्क तयार केला असून त्याला ‘ ओन्ली नोज’ मास्क असे नाव दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी खाता पिताना यामुळे अडचण होणार नाही. हा मास्क घालून त्यावरून नेहमीचा नाक, तोंड झाकणारा मास्क घालता येतो. खाता पिताना वरचा नेहमीचा मास्क काढून ठेवला तरी नाकावर हा मास्क असल्याने करोना संसर्गापासून संरक्षण मिळते असे सांगितले जात आहे. या मास्कला इटिंग मास्क असेही म्हटले जात आहे.

करोनाचे सर्वाधिक संक्रमण नाकातून होते. अमेरिकेच्या जॉन हॉपकीन विद्यापीठाने केलेल्या संशोधनात नाकातील गंध ओळखणाऱ्या पेशी करोनाचे एन्ट्री पॉइंट असल्याचे आढळले होते. त्यामुळे खाता पिताना मास्क काढला की नाक उघडे राहिल्याने हा धोका वाढतो असेही म्हणता येईल. ओन्ली नोज मास्क मुळे हा धोका नक्कीच कमी होईल असा दावा केला जात आहे. हा मास्क कुठल्या संशोधकांनी शोधला त्याची माहिती दिली गेलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार करोना पासून बचावासाठी नाक, तोंड आणि हनुवटी कव्हर करणारे मास्क वापरले जावेत असे म्हटले गेले आहे. ओन्ली नोज मास्क बाजारात कधी येणार हे समजू शकलेले नाही.