जर्मनीत करोनामुळे एप्रिल मध्ये रोज १ लाख संक्रमित होतील अशी भीती

जर्मनी मध्ये करोनाचा प्रसार अतिवेगाने होत असून आरोग्य मंत्री जेन्स स्फेन यांनी एप्रिल मे पर्यंत हा वेग असाच राहिला तर दररोज १ लाख लोकांना करोनाची लागण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. जर्मनी मध्ये करोनाची ही तिसरी लाट असून पहिल्या दोन लाटेंपेक्षा तिची तीव्रता अधिक घातक आहे आणि ही लाट रोखणे अवघड असल्याचेही स्फेन यांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या लाटेत करोनाचा प्रसार वेगाने होण्यामागे अनेक रुग्णाच्या मध्ये बी ११७ व्हेरीयंट विषाणू सापडणे हे आहे असे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री स्फेन म्हणाले, देशात आत्तापर्यंत १० टक्के लसीकरण झाले आहे. करोनाची तिसरी लाट धोकादायक आहे आणि त्यामुळे रुग्णालयात संक्रमितांची संख्या वाढत आहे. याचा ताण आरोग्य सेवेवर येत आहे. प्रवासी लोकांची कोविड १९ टेस्ट सध्या केली जात नसली तरी विमान प्रवास करणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

बाहेरून आलेल्या प्रवाशांमुळे करोना वाढीत खास काही फरक पडलेला नाही असेही स्फेन यांचे म्हणणे आहे.