फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर!


मुंबई – राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. पण, विरोधकांनी या अहवालावर टीका केली आहे. सीताराम कुंटेंनी हा अहवाल तयार केलाच नसेल, जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तो तयार केला असावा, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता फडणवीसांना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, अशी शंका घेणे हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील काही ट्विट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यांनी राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळले, ज्यांचे कुशाग्र बुद्धीसाठी कौतुक केले जाते, अशा राजकीय धुरंधराने राज्याच्या मुख्य सचिवांबद्दल अशी शंका व्यक्त करणे हा त्या मुख्य सचिवांचा, त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या आवाक्याचा अपमान आहे. पोलिसांचे तर खच्चीकरण झाले आहे. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणे सुरू आहे. आता सीताराम कुंटेंबद्दल आमच्या नावाने शंका उपस्थित करून त्यांना काय साध्य करायचे आहे? पण हे तर आहे की फडणवीसांनी किमान हे तरी मान्य केले की आव्हाड अहवाल लिहू शकतात, असे आव्हाड म्हणाले आहेत. ट्विटरवर देखील यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा आरोप हास्यास्पद आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नसल्याचे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान फडणवीस यांनी सीताराम कुंटेंनी दाखल केलेला रिपोर्ट ते तयार करतील, असे मला वाटत नाही. आव्हाड किंवा मलिक यांनी हा रिपोर्ट तयार केला आणि कुंटेंनी त्यावर फक्त सही केल्याचे म्हटले होते.

दरम्यान, सीताराम कुंटे यांच्या अहवालावर आशिष शेलार यांनी शायरी करून टीका केली आहे. एक लम्हे मे हुआ था फासलों का फैसला, फिर यकीन दिलाने मे जमाना लग गया, असं शेलार म्हणाले आहेत. आपली बाजू खरी आणि दुसऱ्याची बाजू खोटी हे दाखवण्यासाठीचा हा अहवाल आहे. प्रभादेवीच्या एका मुखपत्र कार्यालयातून या अहवालाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे याची सत्यासत्यता तपासता येणार नसल्यामुळे या प्रकरणात एक दिवस आधी मंत्रिमंडळ चौकशी ठरवते आणि एका दिवसात चौकशीचा अहवाल येतो. ही तत्परता कोरोना रुग्णांना औषधे पुरण्यात सरकारने दाखवली नसल्याचे शेलार म्हणाले आहेत.