युवराज सिंगचा नवा लुक व्हायरल

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये चांगली कामगिरी बजावलेला युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी चर्चेचे कारण ठरला आहे युवराजचा नवा लुक. टीम इंडियाच्या या माजी ऑलराउंडर खेळाडूने त्याचा लांबलचक केसांच्या नवीन हेअरस्टाईल मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

युवीने लॉकडाऊन लागल्यापासून केस कापलेले नाहीत. त्याच्या या वाढलेल्या केसांना प्रसिद्ध हेअरस्टाईलिस्ट अलीफ हकीम याने सुंदर रूप देऊन युवराजला नवा लुक दिला आहे. हकीमची सेवा अनेक सेलेब्रिटी घेतात. युवराजचे या नव्या लुक मधील फोटो आल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन, इरफान पठाण यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा हिनेही युवराजच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. युवराजने इंडिया लीजंट कडून खेळताना ६ डावात १९४ धावा काढल्या असून त्यात द.आफ्रिका आणि वेस्टइंडीज विरुध्द ओवर मध्ये चार चार षटकार ठोकले आहेत.