करोनासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनीटायझरमुळे कॅन्सर चा धोका?

करोना काळात वारंवार हात धुणे शक्य नसेल तर सॅनीटायझरचा वापर केला जात आहे मात्र काही सॅनीटायझरमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. करोना आल्यापासून जगभरात सर्व लोकांची जीवनशैली आणि सवयीवर परिणाम झाला आहे. करोना संक्रमण रोखण्यासाठी मास्क, सॅनीटायझरचा वापर, सोशल डीस्टन्सिंगची सवय पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या वापरत असलेल्या सॅनीटायझर ब्रांड पैकी ४४ ब्रांड वापराने कॅन्सरचा धोका असल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात नुकतेच एक सर्व्हेक्षण आणि संशोधन अमेरिकेत केले गेले. जगभरात सॅनीटायझरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हॉस्पिटल, घरे, दुकाने अश्या सर्व ठिकाणी सॅनीटायझर वापरले जात आहेत. त्याचे लहानमोठे दुष्परिणाम होताना दिसत आहेतच पण सॅनीटायझर दीर्घ वापरामुळे आणखी काही धोके निर्माण होतात का हे पाहण्यासाठी हे सर्व्हेक्षण केले गेले. त्यात २६० पेक्षा अधिक सॅनीटायझरची तपासणी केली गेली. त्यातील ४४ सॅनीटायझर मध्ये धोकादायक रसायनांचा वापर केला गेल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात अमेरिकन अन्न आणि औषध विभागाला पत्र लिहून माहिती दिली गेली आहे.

या ४४ सॅनीटायझरमध्ये बेन्झिन रसायनाचा वापर केल्याचे आढळले आहे. हे रंगहीन रसायन सतत संपर्कात राहिले तर माणसाच्या रक्तकोशिकांच्या कामात दोष निर्माण होतो आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जागतिक आरोग्य संघटनेने हे रसायन धोकादायक रसायन यादीत श्रेणी १ मध्ये ठेवले आहे. बेन्झिनची ओळख कार्सिनोजेन रुपातही आहे. हा पदार्थ कॅन्सरचा धोका वाढवितो.