पुण्यातील लॉकडाउनबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य


मुंबई – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. पुण्याचाही यामध्ये समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अनेक शहरांनी लॉकडाउनचा पर्याय निवडला आहे. दरम्यान पुण्यातील स्थितीसंबंधी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली असून त्यांनी लॉकडाउनसंदर्भातही भाष्य केले आहे.

कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. मुख्यमंत्र्यांसहित सर्वजण आपल्याला आवाहन करत आहेत. काही शहरांमध्ये प्रमाण वाढले आहे. उद्या पुण्यात पालकमंत्री नात्याने लोकप्रतिनिधींना बोलवले असून अधिकाऱ्यांसोबत दर शुक्रवारी बैठक होत असते. आम्ही या बैठकीत निर्णय घेतो. लॉकडाउनसंबंधी मतांतर आहे, पण नियमांचे पालन केले पाहिजे यावर एकमत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्यामुळे यामध्ये पक्षीय राजकारण न आणता हे आपल्या सर्वांवरचे संकट आहे, या भावनेने आपण कोरोनाशी लढले पाहिजे. ४५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी आम्ही केली होती, ती मान्य झाली त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. पण आता ४५ च्या आतील अनेकांना कोरोना होत आहे. मी देवगिरी जिथे राहतो तिथे अनेक कर्मचारी वास्तव्यास आहेत. काल सगळ्यांची तपासणी केली तर नऊ लोक पॉझिटिव्ह होते. कोरोनाचा मुकाबला आपल्याला करावाच लागणार आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आर्थिक मदत कम कमी पडू न देण्याची भूमिका असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.

यावेळी इतर मुद्द्यांवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्या कोणाच्या सांगण्यावरुन झालेल्या नाहीत. त्यासाठी एक कमिटी असते. नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या चार पाच अधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली, त्यांची बदलीच झालेली नाही. माझ्यासमोर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत. अहवाल देण्यासाठी त्यांना सांगितला असून तो अहवाल लवकरच येईल. यातून अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. राज्यपालांना भेटून तिन्ही पक्षांचे प्रमुख सध्याची परिस्थिती आणि कामकाजाची माहिती दिली जाणार होती. पण ते बाहेर असल्याने भेट झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासंबंधी निकाल दिला असून उच्च न्यायालयातही तारीख आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी सर्वाची मते जाणून घेतली. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची भूमिकाही जाणून घेतली आहे. उद्दव ठाकरेंच्या पाठीशी मंत्रिमंडळ असल्याचा असा विश्वास सर्वांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. चौकशीत भेदभाव करण्याची आपल्याला गरज नाही. एटीएसनेही चांगला तपास केला होता. जे सत्य आहे ते राज्यातील जनतेसमोर येईल. अजून कोणची चौकशी करण्याची गरज असेल तर त्यासंदर्भात राज्य सरकार, राज्याचे प्रमुख भूमिका घेतील. भाजपने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने पोलीस दलातील काहीजण सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर कठोर भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल, असा विश्वास मला जनतेला द्यायचा असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत. बदल्याचे रॅकेट असल्याचे म्हटले जात असून त्यात कोणाची नावे येत आहे? त्यांची विश्वासार्हता काय आहे? जी यादी दिली त्यांच्या बदल्या झाल्या का? तुम्हाला मी कागदपत्रे दाखवू का ? प्रशासनात मी आज काम करत नाही, ३० वर्ष झाली काम करत आहे. कायदा सुव्यस्थेला तसेच पोलील दलाला गालबोट लावण्याचे काम करत असेल तर त्यांच्यासाठी हयगय करण्याचे काहीच कारण नसल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.