पुतीन यांनी गुपचूप करोना लस घेतल्याने चर्चेला तोंड फुटले

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी गुपचूप कोविड १९ साठीची लस घेतल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे. पुतीन यांनी नक्की कोणती लस घेतली हे जाहीर केले गेलेले नाही अथवा त्यांचा लस घेतानाचा फोटोही आलेला नाही. त्यामुळे पुतीन यांनी खरोखरच करोना लस घेतली का अशी शंका उपस्थित केली जात आहे. जगभरातील तमाम नेते आपल्या देशातील नागरिकांनी निर्धास्तपणे कोविड १९ साठी लसीकरण करून घ्यावे, त्यांना लसीच्या सुरक्षेची खात्री वाटावी यासाठी सर्वप्रथम स्वतः करोना लस घेत आहेत आणि त्यांचे फोटो प्रसिध्द करत आहेत. पुतीन यांनी मात्र असे काहीही केलेले नाही.

पुतीन यांनी मंगळवारी करोना प्रतिबंधक लस घेतली असल्याचे एका सरकारी पत्रकातून जाहीर केले गेले आहे. मात्र पुतीन यांचा लस घेतानाचा फोटो अथवा व्हिडीओ घेतला गेलेला नाही. रशियन राष्ट्रपतींना कॅमेऱ्याची इतकी भीती का असा प्रश्न त्यामुळे विचारला जात आहे. वास्तविक जेव्हा लस घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याची गरज असताना पुतीन कॅमेऱ्याला का सामोरे गेले नाहीत असा सवाल केला जात आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कॉव यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार पुतीन यांनी करोना लस घेतली आणि त्यांची तब्येत चांगली असून लस घेतल्यावर त्यांनी दिवसभर काम केले. लसीकरणाचा फोटो किंवा व्हिडीओ केला गेला नाही यामागे पुतीन याना फोटो काढून घेणे आवडत नाही असे कारण दिले गेले आहे. पुतीन यांनी कोणती लस घेतली हे जाहीर केले गेलेले नसले तरी रशियात मंजुरी असलेल्या तीन रशियन लसींपैकी एक लस त्यांनी घेतल्याचे दिमित्री यांनी स्पष्ट केले आहे.

लसीचे नाव न सांगण्यामागे तिन्ही लसी सुरक्षित आहेत याची खात्री नागरिकांना पटावी हा उद्देश असल्याचे दिमित्री म्हणाले. रशियाची लोकसंख्या १४.६ कोटी असून आत्तापर्यंत ६३ लाख नागरिकांना लस दिली गेली आहे.