कोरोना लस घेतल्यानंतरही रश्मी ठाकरे कोरोनाबाधित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची करोना चाचणी पॉझीटीव्ह आली असून त्यांना करोना संसर्ग झाल्याचे जाहीर केले गेले आहे. रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ मार्च रोजी मुंबईच्या जे जे रुग्णालयात करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोमवारी रात्री रश्मी ठाकरे यांची करोना चाचणी घेतली गेली तेव्हा त्यांना करोना संसर्ग झाला असल्याचे दिसून आले. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर विलगीकरणात ठेवले गेले आहे.

दोन दिवसापूर्वी उद्धव यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्रात करोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत असून अनेक शहरातून प्रशासनाने कडक नियमावली जारी केली आहे. रात्रीची संचारबंदी लागू करूनही रविवारी राज्यात एका दिवसात ३०५३३ करोना रुग्ण आढळून आले आहेत.