पुणे : पुणे शहर दलात समाविष्ट होणार म्हणून गेले दोन ते अडीच वर्षांपासून चर्चेत आलेले लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन पोलीस ठाणे अखेर सोमवारी (दि. २२ ) रोजी मध्यरात्रीपासुन पुणे शहर आयुक्तालयाशी जोडण्यात आल्यामुळे या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे शहर आयुक्तालयाशी जोडण्यात आली लोणी काळभोर अन् लोणीकंद पोलीस ठाणे
सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून पुणे शहर आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी लोणी काळभोर व लोणी कंद या दोन्ही पोलीस ठाण्यांचा कारभार हाती घेतल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असणारी लोणीकंद व लोणी काळभोर या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश होणार असल्याच्या चर्चा गेले दोन ते अडीच वर्षापासून रंगत होत्या. परंतू, पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय प्रतिनिधींकडूनही तारखेवर तारखा मिळत असल्यामुळे पोलीस खात्याबरोबरच, सर्वसामान्य नागरिकांचेही दोन्ही पोलीस ठाण्यांच्या शहर पोलिसांत होणाऱ्या समावेशाकडे लक्ष लागलेले होते. यासाठी अखेर सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुहुर्त मिळाला.
मंगळवारी ( १६ मार्च ) रोजी या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या समावेशासाठी राज्य सरकारने लेखी स्वरुपात परवानगी दिली होती. यामुळे १८ मार्चपुर्वीच लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाणे यांचा ताबा पुणे शहर पोलिसांच्या कडे जाणार होता. परंतू काही शासकीय कामकाजामुळे दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी विलंब लागला.
लोणी काळभोर पोलीस ठाणे शहर पोलिसांत समावेश होणार असल्याच्या चर्चेबरोबरच उरुळी कांचन व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होणार असल्याची चर्चाही रंगली होती. वाघोली व उरुळी कांचनसाठी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी व्हावी यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठकही झाली होती. पण सोमवारी रात्री लोणी काळभोर बरोबरच उरुळी कांचनचाही समावेश शहर पोलिसात केला गेला.
उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी आग्रही असताना मात्र या ठाण्याच्या निर्मितीला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पुणे शहर पोलीस पथकाने हाती घेतला आहे. यामुळे अधिकृतरित्या या पोलीस ठाण्याचा समावेश शहर पोलिस दलात झाला आहे.