नवनीत राणांनी केलेला आरोप अरविंद सावंतांनी फेटाळला


नवी दिल्ली – मुख्यमंत्र्यांना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्राचे पडसाद सोमवारी (२२ मार्च) संसदेत उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत भाजप खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही गंभीर आरोप केला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांनी तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. दरम्यान सावंत यांनी खासदार राणा यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर त्यांचा राग असण्याच्या कारणांचाही त्यांनी उलगडा केला.

खासदार अरविंद सावंत म्हणाले, हे साफ खोटे आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, मला येता जाता त्या भैया-दादा म्हणून बोलतात. त्यांच्याशी मी ही बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, मी त्यांना धमकावले हे साफ खोटे आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही जर बघितले, तर त्या जेव्हा केव्हा सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल, त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी माझ्या आयुष्यात कधीही कुणाला धमकावले नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?, असे सावंत म्हणाले.


आज सभागृहात झाल्याचे त्यांचे काही म्हणणे आहे. तर महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्यासाठी आज भाजपचे खासदार बोलत होते. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या समोरील वेलमध्ये आम्ही गेलो होतो. घोषणा देत होतो. मी जर जाताना त्यांना असे बोललो, तर मी तिथे थांबायलाही हवे होते ना. त्यांच्या आजूबाजूला लोक बसलेली असतात. त्यांना विचारावे. मी अशी भाषा वापरेल का? असे माझ्याकडून आयुष्यात होणार नाही. त्या एक महिला आहेत. अशी कामे आम्ही करत नसल्याचे सावंत म्हणाले.

उलट अशी सवयच त्यांना आहे. ज्या मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. तिथे पूर्वी शिवसेनेचे खासदार होते, आनंदराव आडसूळ. त्यांनी त्यांच्यावर (नवनीत राणा) गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामुळे त्यांच्या मनात राग आहे. त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून तो गुन्हा दाखल केलेला आहे. ते प्रकरण आता न्यायालयात असल्यामुळे जेव्हा केव्हा त्या सातत्याने बोलतात त्या उद्धव ठाकरे यांना अवमानित करतात. मी त्यांना अनेक वेळा बोललो आहे की, कुणावरही वैयक्तिकरित्या किंवा नाव घेऊन टीका करत जाऊ नका. आजही बघा.

सभागृहात कुणाचेही नाव घ्यायचे नाही म्हणून सभागृहात टोकले जाते. कारण ते नोंदले जाते. हे सगळे बघितले की वाईट वाटते. कधीही महिलांना मी धमकावले नाही. लोक सरळ सरळ खोटे बोलू शकतात, याचेही मला आश्चर्य वाटत आहे. काही लोकांकडे असे कौशल्य असते की, एखाद्या गोष्टीवरून प्रसिद्धी मिळवणे. त्यांचा मागील एक दीड वर्षांचा काळ बघा. अॅसिड फेकण्याचे कृत्य कधीच करणार नाही, पण जर कुणी करत असेल, तर मी नवनीत राणांच्या बाजूने उभा राहिन, असे म्हणत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळून लावला आहे.