पिगकॅसो डुकराने केलेल्या प्रिन्स हॅरीच्या पेंटिंगला मिळाले २.३५ लाख

जगभरातील कलाकारांच्या विविध कलाकृती रसिक लाखो रुपये मोजून विकत घेत असतात. पण एका डुकराने केलेल्या पेंटींग्सची सुद्धा हातोहात विक्री होते ही नवलाची बाब म्हणावी लागेल. पिगकॅसो या चार वर्षाच्या डुकरीणीने ब्रिटन राजघराण्यातील प्रिन्स हॅरीचे अवघ्या काही मिनिटात एक पेंटिंग बनविले आणि ते चक्क २३५० पौंड म्हणजे २.३५ लाख रुपयात विकलेही गेली. एका स्पॅनिश ग्राहकाने हे पेंटिंग विकत घेतले असल्याचे समजते.

पिगकॅसो ही सेलेब्रिटी पेंटर म्हणून प्रसिध्द झाली आहे. जोने लेक्सन या महिलेने तिची चार वर्षापूर्वी म्हणजे २०१६ मध्ये कसाईखान्यात जाण्यापासून सुटका केली होती. जोनेने द. आफ्रिकेत प्राणी अभयारण्य सुरु केले असून तेथे अनेक प्राणी सांभाळले जातात. पिगकॅसो आता याच फार्मवर जोनेसोबत राहते. जोने सांगते जेव्हा प्रथम पिगकॅसोला येथे आणले तेव्हा ती पिलू होती. तिच्यासमोर जेव्हा बॉल, ब्रश असे सामान टाकले गेले तेव्हा तिने ब्रश सोडून बाकी सामान मोडून टाकले.

पिगकॅसोला रंगांचे खूप आकर्षण आहे. ती बुद्धिमान आहे आणि कलाकार आहे. तोंडात ब्रश धरून ती रंगांचे जोरदार फटकारे कॅनव्हासवर मारते आणि त्यातून अतिशय सुंदर, आकर्षक कलाकृती निर्माण होतात. पिगकॅसो अॅब्स्ट्रॅक कलाकृती रेखाटते. जगप्रसिध्द चित्रकार पिकासो वरून तिचे नाव पिगकॅसो ठेवले गेले आहे. स्वीस वॉच ब्रांड बरोबर पिगकॅसोचा करार झाला असून लिमिटेड एडिशन वॉचबरोबर पिगकॅसोची आर्ट दिली जाते. कलाप्रदर्शन भरविणारा पाहिला प्राणी अशीही तिची ओळख आहे.’ O INK’ नावाने पिगकासोच्या पेंटिंगची प्रदर्शने पॅरिस, लंडन, बर्लिन, अॅमस्टरडॅम अश्या युरोपीय शहरात भरविली जातात. तिने आत्तापर्यंत पेंटिंग विक्रीतून ५० हजार पौंड कमाई केली असून हा सर्व पैसा मुक्या प्राण्यांच्या देखभालीसाठी वापरला जातो.