वर्षपूर्ती ‘जनता कर्फ्यू’ची : सोशल मीडियावर मीम्स आणि व्हिडीओचा पाऊस


नवी दिल्ली – ज्यादिवशी कोरोना या महामारीने भारतात प्रवेश केला त्यावेळी प्रत्येकाची एका विषाणूची जीवघेणी भीतीआणि त्याबद्दलच्या प्रचंड अफवा, अशीच मानसिकता होती. कोरोनाने इतर देशाप्रमाणे भारतात पाऊल ठेवले. संथ गतीने आलेल्या कोरोनाने महिनाभरातच देशात हाहाकार उडवला. प्रचंड वेगाने पसरत चाललेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.


पंतप्रधानांनी त्यावेळी सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. ‘’…आज मैं हर एक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं, ये है जनता कर्फ्यू… यानी जनता के लिए… जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू…’’असे मोदी त्यावेळी म्हणाले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर संध्याकाळी दिवे लावून कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. या वर्षपूर्तीनिमित्ताने सोशल मीडियावर जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे. त्याचबरोबर मीम्स आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत.