वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोरोनाबाधित


डेहरादून – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यासंदर्भातील माहिती रावत यांनीच ट्विटरवरुन दिली होती. विशेष म्हणजे रावत यांनी रविवारी नैनिताल जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

माझ्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले असून माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मला कसलाही त्रास होत नाही. मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत:ला आयसोलेट केले असून माझ्या संपर्कात मागील काही दिवसांमध्ये जे कोणी लोक आले असतील, त्यांनी कृपया काळजी घ्यावी आणि स्वत:ची चाचणी करुन घ्यावी, असे ट्विट रावत यांनी केले आहे. दरम्यान कालच रावत हे अन्य एका कार्यक्रमामध्येही सहभागी झाले होते. त्यांनी होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्याचे फोटो ट्विट केले होते.