सरकारचा तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न – राजेश टोपे


मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणखीनच गडद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांबरोबरच, कोरोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांना राज्यातील कोरोना परिस्थती व लसीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. सध्या दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले, राज्यात दररोज ३ लाख लोकांचे लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणे वाढवत आहोत व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे येथून पुढे आणखी जे जे लोक लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचे आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा असल्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेले आहे.

ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्यांच्यावर त्यांनी स्वतः देखील लक्ष द्यावे आणि अनेकजण सोसायटीमध्ये राहतात, तेथील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवावे. आमचे आरोग्य कर्मचारी देखील त्यांच्यावर ठेवून आहेत, त्यामुळे संसर्ग कसा टाळता येईल, या दृष्टीने आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे देखील टोपेंनी यावेळी सांगितले.

जिथे आता निवडणुका सुरू आहेत. गुजरातमध्ये टी-२० मालिका सुरु आहे, तेथे गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होत नाही. हाफकिनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी. आम्ही तिथे १७ लाख डोस तयार करू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे. कोव्हिशिल्डच्या २ डोसमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्याची माहिती टोपे यांनी दिली.

काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून वाढत्या रुग्ण संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावे लागतील, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणण आहे. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत उद्या पुन्हा यावर चर्चा होईल. पण जनतेला एकच आवाहन करतो की, लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी जनतेला केले आहे.