बाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय

bathroom
घराच्या इतर खोल्या ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे घरामधील बाथरूमही स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते. किंबहुना बाथरूमची स्वच्छता करण्यास जास्त मेहनतीची आवश्यकता असते. यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब केला तर हे काम देखील झटपट होऊ शकते. बाथरूम स्वच्छ करताना सफाईचे वेळापत्रक दररोज आणि आठवड्यातून एकदा या हिशोबाने आखावे. बाथरूममध्ये असलेले वॉश बेसिन, कमोड आणि बाथरूममध्ये जमिनीवर असलेल्या टाईल्स यांची स्वच्छता दररोज, तर बाथरूमच्या भिंतींवर लावलेल्या टाईल्स, नळ, शॉवर, दिवे, बादल्या, पाण्याचे मग, यांची स्वच्छता आठवड्यातून एकदा केली जाऊ शकते.
bathroom1
बाथरूमची स्वच्छता करण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करूनही बाथरूम स्वच्छ करता येऊ शकते. बाथरूममधील कमोड किंवा वॉशबेसिनवर अनेकदा खाऱ्या पाण्याचे किंवा इतरही डाग दिसून येतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट एखाद्या जुन्या टूथब्रशच्या सहाय्याने डागांवर लावावी. काही मिनिटे ही पेस्ट डागांवर राहू देऊन त्यानंतर ब्रशने हे डाग रगडून साफ धुवून टाकावेत. जर डाग खूप जुने असतील, तर मात्र ते त्वरित नाहीसे होण्यास कठीण असतात. त्यामुळे दररोजच्या सफाईसोबत आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टचा वापर बेसिन आणि कमोड धुण्यासाठी करावा. भिंतींवरील टाईल्सच्या फटींमध्ये साठलेली काळसर घाण काढण्यासाठी देखील बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाच्या पेस्टचा उपयोग होतो.
bathroom2
अनेकदा बाथरूममधील नळावर, किंवा शॉवरवर खाऱ्या पाण्याचे पांढरे डाग दिसून येतात. अशा वेळी लिंबाच्या फोडी नळ किंवा शॉवरवर रगडल्याने हे पांढरे डाग दूर होतात. बाथरूममधील जमिनीवरील टाईल्स दररोज साफ करणे चांगले. यासाठी बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेल्या अनेक प्रोडक्ट्सपैकी कशाचाही वापर करता येऊ शकेल. आठवड्यातून एकदा बाथरूममधील बादल्या, पाण्याचे मग इत्यादी वस्तू कोमट पाणी आणि थोड्या साबणाचा वापर करून स्वच्छ धुवावेत. तसेच आठवड्यातून एकदा बाथरूममध्ये लावलेल्या दिव्यांवर किंवा एक्झॉस्ट फॅनवर जमा होणारी धूळ स्वच्छ कपड्याने स्वच्छ करावी. बाथरूममध्ये असणारे आरसे किंवा काचेचे शॉवर पॅनल, व भिंतींवरील टाईल्स स्वच्छ करण्याकरिता एक भाग व्हिनेगर आणि तीन भाग पाणी या मिश्रणाच्या ‘स्प्रे’ चा वापर करावा.
bathroom3
बाथरूम धुण्यासाठी वापरत असलेले ब्रश, टॉयलेट ब्रश देखील स्वच्छ आणि कोरडे राहतील याची काळजी घ्यावी. बाथरूममध्ये दुर्गंधी राहू नये यासाठी एअर फ्रेशनरचा वापर करावा. यासाठी एअर फ्रेशनर घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकेल. यासाठी एक कप अल्कोहोलमध्ये दहा ते पंधरा थेंब इसेन्शियल ऑईल घालून स्प्रे तयार करावा. हा स्प्रे फवारल्याने बाथरूमधील दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत होते.

Leave a Comment