उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या आजारांपासून रहा सावध

heat
आता थंडी सरून वाढत्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस म्हटले की शाळांच्या, कॉलेजांच्या सुट्ट्या आल्याच आणि त्याचबरोबर लहान मोठ्या सहली, भटकंतीही ओघाने आलीच. सहलींचा, भटकंतीचा, आनंद मनापासून घेत असताना जर थोडीशी काळजी घेतली, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हटकून उद्भविणाऱ्या आजारांचा धोका सहज टाळता येऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात काही आजार उद्भविण्याचे प्रमाण जास्त असते. मलेरिया, डोळे येणे, त्वचेवर अॅलर्जी, आणि अर्थातच हीट स्ट्रोक अशा व्याधी या दिवसांमध्ये जास्त आढळतात. या व्याधींचा धोका टाळण्यासाठी थोडी खबरदारी घेणे अगत्याचे असते.
heat1
उन्हाळ्याच्या दिवसांत ‘पोलन’ किंवा फुलांच्या परागकणांची अॅलर्जी होऊन डोळे येण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत पोहोण्याचा आनंद बहुतेक मंडळी घेत असल्याने स्विमिंग पूलच्या पाण्यामधून ही जंतूंचा संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये शरीरावर घाम आणि त्याद्वारे इतर बॅक्टेरियांचा संसर्ग वाढल्याने आणि तेच हात वारंवार डोळ्यांना लावले गेल्याने डोळे येऊ शकतात. जर डोळ्यांना सतत खाज सुटून डोळ्यांतून पाणी आणि चिकट स्राव येऊ लागला, डोळे लाल होऊन त्यांवर हलकी सूज दिसू लागली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. डोळे आल्यास पोहायला जाऊ नये, आणि इतरांशी संपर्क टाळावा. त्याचबरोबर कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात निर्जंतुक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून हा संसर्ग इतरांना होणार नाही.
heat2
उन्हाळ्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ होते. हवेमध्ये उष्मा आणि दमटपणा देखील वाढतो. हे हवामान बॅक्टेरिया आणि फंगसच्या जीवाणूंच्या वाढीसाठी पूरक असते. त्यामुळे उद्भविणाऱ्या फंगल इन्फेक्शन्स मुळे त्वचेवर पुरळ, फोड किंवा तत्सम अॅलर्जी उद्भवू शकतात. यासाठी त्वचा नेहमी स्वच्छ आणि कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये सुती, आणि थोडेसे ढिले कपडे वापरणे चांगले, जेणेकरून त्वचा कोरडी राहू शकेल. घाम अवशोषित झालेले कपडे वारंवार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळविणे चांगले. ज्यांच्या त्वचेवर उन्हाळ्यामध्ये वारंवार घामोळी किंवा पुरळ येत असेल, त्यांनी कडूलिंबाची पाने पाण्यामध्ये चांगली उकळून घेऊन हे पाणी स्नानाच्या पाण्यामध्ये मिसळून याने स्नान करावे.
heat3
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अनेकदा हे आजार वेळीच लक्षात आले नाहीत तर रुग्णाच्या जीवाला देखील धोका उत्पन्न होऊ शकतो. हे आजार पावसाळ्याच्या दिवसांत अधिक दिसून येत असले, तरी अलीकडच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवेतील दमटपणा वाढल्यामुळेही हे आजार आढळून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मलेरियाचे डास जास्त आढळून येतात. या डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराच्या आसपास सांडपाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. झाड्यांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नये. त्याच बरोबर घराच्या आणि ऑफिसेसच्या परिसरामध्ये औषधांची फवारणी थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने करून घ्यावी. वारंवार थंडी वाजून ताप येऊ लागल्यास, तापासोबत अंगदुखी, सांधेदुखी उद्भविल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकदा मलेरियाचा ताप व्हायरल इन्फेक्शनमुळे झाला असावा असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तसे न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या तपासण्या करून घेऊन योग्य उपचार करणे आवश्यक असते.
heat4
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराबाहेर पडल्यावर उन्हामध्ये हिंडताना डोकेदुखी सुरु होते, किंवा एखादेवेळी अचानक अशक्तपणा वाटून चक्कर ही येते. हे लक्षण हीट स्ट्रोकचे आहे. असे होऊ नये म्हणून शक्यतो भर उन्हामध्ये बाहेर पडणे टाळावे, पण ते शक्य नसेल तर उन्हामध्ये बाहेर पडताना डोके आणि मान झाकली जाईल अशा पद्धतीने स्कार्फ किंवा ओढणीचा वापर करावा. बाहेर पडताना आपल्यासोबत नेहमी पिण्याच्या पाण्याची बाटली असावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment