या दोन गावांमध्ये परस्परांशी केली जात नाही सोयरीक

wedding
होळीचा सण आता जवळ येत असून, उत्तर प्रदेशातील नंदगाव आणि बरसाना येथे साजरी होणारी लठमार होळी पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात. या दोन्ही गावांमध्ये ही आणि अशा अनेक परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. पण दोन्ही गावांमधील चालीरीती, परंपरा जरी एकसारख्या असल्या तरी या गावांच्या इतिहासामध्ये आजतागायत सोयरिक मात्र कधी जुळलेली नाही. आपापसात सोयरिक न करण्याची परंपरा ही फार प्राचीन काळापासून येथे रूढ आहे.
wedding1
स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही गावातील लोकांचे परस्परांशी संबंध खूप चागले असले, तरी दोन्ही गावातील लोकांनी आजवर एकमेकांशी कधी सोयरीक मात्र केलेली नाही. या प्राचीन परंपरेमागे भगवान कृष्ण आणि त्यांची सखी राधा यांची अमर प्रेमकहाणी असल्याचे म्हटले जाते. राधा बरसाना गावाची राहणारी असून श्रीकृष्ण नंदगावामध्ये राहणारे होते. या दोघांचा विवाह झाला नसला, तरी या दोघांची प्रेमकहाणी अतिशय पवित्र मानली जात असून, श्रीकृष्णाला बरसाना गावाचा जावई आणि राधेला नंदगावाची सून मानले जाते. बरसाना गावाचा जावई केवळ श्रीकृष्ण आणि नंदगावाची सून केवळ राधा अशी मान्यता असल्यामुळे इतर कोणाचीही सोयरिक दोन्ही गावांतील लोक करीत नाहीत.
wedding2
या परंपरेच्या अनुसार राधा बरसाना गावाची लेक आणि नंदगावाची सून मानली जाते. आपल्याकडे असलेल्या प्रथेनुसार मुलीच्या सासरच्या घरी तिचे आईवडील किंवा कोणी नातेवाईक गेल्यानंतर तेथील पाणीही न पिण्याची पद्धत असे. हीच पद्धत अनुसरून आजच्या काळामध्ये बरसाना गावातील वयस्क लोक जर नंदगावात गेले, तर आजही तेथील पाणी पीत नसल्याचे म्हटले जाते. तसेच नंदगावामधून बरसाना मध्ये पाहुणे मंडळी आल्यास, ती मुलीच्या सासरहून आली आहेत असे समजून त्यांचे यथायोग्य मानपान करण्याची प्रथा येथे रूढ आहे.

Leave a Comment