परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल करणार अब्रुनुकसानीचा खटला : अनिल देशमुख


मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाला परमबीर सिंग यांच्या नावे एक पत्र आले असून परमबीर सिंग यांनी या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात या पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ट्विट करत तात्काळ आरोप फेटाळले. तर भाजपसह मनसेने आक्रमक पवित्रा घेत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर एक पत्रक जाहीर करुन आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. मी पुढील महत्वाच्या गोष्टींवर आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन परमबीर सिंग, हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल.

आपणास पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च रोजी पाटील यांना व्हॉट्सअॅप चॅटवरुन काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. परमबीर सिंग यांना या चॅटच्या माध्यमातून पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरुन उत्तरे मिळवताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते, हे त्यांच्या चॅटवरुन आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहोत. याचा अर्थ काय?

सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनकसानीचा खटला दाखल करत आहे.