हे आहे छत्तीसगड येथील ‘कुकुरदेव मंदिर’

temple
भारतामधील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांच्या बद्दल तुम्ही ऐकले असेल. असेच एक खास मंदिर छत्तीसगड राज्यामध्ये आहे. या मंदिराला ‘कुकुरदेव मंदिर’ या नावाने संबोधले जात असून, या मंदिरामध्ये कुत्र्याच्या मूर्तीची पूजा केली जाते. या मंदिराशी निगडित अनोख्या मान्यता आणि या मंदिराचा इतिहास मोठा रोचक आहे. छत्तीसगड मधील रायपुर पासून सुमारे १३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्ग जिल्ह्यातील खपरी गावामध्ये हे ‘कुकुरदेव’ मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुत्र्याची मूर्ती स्थापिलेली आहे. या मूर्तीच्या शेजारीच एक शिवलिंगही आहे. श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. यावेळी शिवशंकराच्या पूजेसोबतच कुकुरदेवाच्या मूर्तीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे.
temple1
या मंदिराचा परिस सुमारे दोनशे मीटर क्षेत्रामध्ये विस्तारलेला असून, या मंदिराच्या गर्भगृहाप्रमाणे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देखील कुत्र्यांच्या मूर्ती उभ्या आहेत. या मंदिरामध्ये दर्शनाला आल्याने कुत्रे चावण्याचा धोका नाहीसा होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे कुकुरदेव मंदिर वास्तविक एक स्मारक आहे. एका अतिशय इमानी कुत्र्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक येथे बनविण्यात आले असल्याचे म्हटले जाते. असे म्हणातात, की कैक वर्षांपूर्वी एक निर्वासित आपल्या परिवारासमवेत या गावामध्ये आला. त्याच्याबरोबर त्याचे कुत्रेही होते. गावामध्ये दुष्काळ पडला, तेव्हा परिवाराची गुजराण होण्यासाठी या निर्वासिताने गावाच्या सावकाराकडून कर्ज घेतले. कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवण्यासाठी काहीच नसल्यामुळे या निर्वासिताने आपला कुत्रा या सावकाराला दिला.
temple2
एकदा या सावकाराच्या घरी चोरी झाली. चोरांनी सर्व पैसाअडका, दागिने चोरी करून सर्व माल जवळच जमिनीत पुरला, आणि नंतर मोका मिळताच हा माल लंपास करण्याचे ठरवून ते तिथून निघून गेले. पण सावकाराकडील इमानी कुत्रा सावकाराला त्याच ठिकाणी अचूकपणे घेऊन गेला, आणि सावकाराला त्याची चोरी झालेली सर्व संपत्ती परत मिळाली. सावकाराने कुत्र्याच्या या इमानीपणाचे कौतुक म्हणून त्याला त्याच्या मालकाकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने कुत्र्याला सोडून दिले, तेव्हा तो कुत्रा निर्वासिताकडे परतला. घडल्या प्रकाराची निर्वासिताला काहीच कल्पना नसल्यामुळे आपला कुत्रा सावकाराकडून पळून आला आहे असे वाटून निर्वासिताला आपला राग अनावर झाला आणि त्याने त्या कुत्र्याला मारून टाकले.
temple3
कुत्रा मेल्यानंतर त्याच्या गळ्यातील पट्ट्यामध्ये एक चिठ्ठी असलेली निर्वासिताला दिसली. ही चिठ्ठी सावकाराची असून त्यामध्ये सावकाराने चोरीची सर्व घटना सविस्तर लिहिली असून, कुत्र्याचे आभार मानत त्याला आपण परत पाठवीत असल्याबद्दल लिहिले होते. हे पत्र वाचून निर्वासिताला खरा प्रकार समजला आणि त्याच्या हातून घडलेल्या कृत्याचा त्याला खूप पस्तावा झाला. या कुत्र्याच्या स्मरणार्थ हे मंदिर त्याने बांधविले, असा या मंदिराचा इतिहास आहे.

Leave a Comment