कहाणी ब्रज येथील पारंपारिक ‘लठमार होळी’ची

holi
‘अनुपम होली होत है लठ्ठन की सरनाम, अबला सबला सी लागे, बरसाने की वाम’ – दक्षिणेतील मुदारैपट्टनम येथील नारायण भट्ट यांचे वंशज हरीगोपाल भट्ट यांनी आपल्या कवितेतून नंदगाव-बरसाना येथे साजऱ्या होणाऱ्या ‘लठमार होळी’चे हे अनेक दशकांपूर्वी केलेले वर्णन आहे. आजच्या आधुनिक काळातील नारीचे सशक्तीकरण दर्शविणारे हे शब्द आहेत. समस्त देशातच प्रसिद्ध असणारी ब्रज येथील ‘लठमार’ होळी, हे अतिशय खास पर्व म्हणावयास हवे. हा उत्सव केवळ श्रीकृष्णाच्या भक्तीचे प्रतीकच नव्हे, तर नारीचे सशक्त रूप दर्शविणाराही आहे. होळीच्या या अनोख्या परंपरेविषयी जाणून घेऊ या.
holi1
सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी मुस्लीम शासकांच्या जाचाला त्रासलेल्या ब्रजबालांना आत्मरक्षण करण्यासाठी ब्रजाचार्य नारायण भट्ट यांनी प्रवृत्त केले. त्यांच्या आग्रहाखातर आत्मरक्षणासाठी ब्रजमधील स्त्रियांनी लाठी चालविण्याचे कसब आत्मसात करण्याचा निर्णय घेतला. ब्रज-आचार्य नारायण भट्ट यांच्या आग्रहाखातर ब्रजबालांनी हातामध्ये लाठी उचलली खरी, पण ही लाठी चालविण्याचा सराव कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला. सरतेशेवटी घरातील पुरुषांवरच लाठी चालवून पाहण्याचे प्रयोग सुरु झाले ! आताच्या काळामध्ये देखील ही परंपरा खास लठमार होळीच्या दिवशी दिसत असून, या दिवशी महिला आपापल्या पतीदेवांना आपल्या लाठी चालविण्याचे कसब दाखवून देत असतात.
holi2
या परंपरेशी निगडित आणखी एक कथा अशी, की राधेबरोबर होळी खेळताना श्रीकृष्णांना वेळेचे भान रहात नसे. अशा वेळी त्यांना परतायला भाग पाडण्यासाठी सर्व गोपिका फुलांनी सजविलेल्या लाठीने मारण्याचे भय श्रीकृष्णांना दाखवीत असत. त्यावरूनच ही परंपरा अस्तित्वात आल्याची आख्यायिका आहे. या सणाचा उत्साह आजही नंदगाव-बरसाना या ठिकाणी वसंत पंचमीपासून दिसू लागतो. अमावस्येनंतर येणाऱ्या नवमी आणि दशमीला लठमार होळीचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व स्त्रिया शृंगार करून, पारंपारिक वेशभूषा लेऊन हातांमध्ये सुशोभित केलेल्या लाठ्या घेऊन या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. या उत्सवामध्ये सहभागी होणारी पुरुष मंडळी देखील पारंपारिक वेशभूषेमध्ये हाती चामड्याची ढाल घेऊन सज्ज असतात. नंदगाव-बरसाना येथील ज्या ठिकाणी या होळीचे आयोजन होते, त्या ठिकाणाला ‘रंगीली गली’ म्हटले जाते. ही लठमार होळी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असून, अशा प्रकारची होळी अन्यत्र कुठेही साजरी केली जात नसल्यामुळे हा उत्सव पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकही येथे मोठ्या संख्येने येत असतात.

Leave a Comment