राज्यातील आयटीआयमध्ये उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी उपक्रम


मुंबई : उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्यम लर्निंग फाउंडेशनचे संस्थापक मेकिन महेश्वरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपक्रमामधील नवीन शिक्षणप्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःसाठी आणि इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकतील. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांच्या उपक्रमासाठी राज्यातील 32 आयटीआयची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील 417 आयटीआयमधील 90 हजारहून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येईल.

उद्यम उपक्रमात विद्यार्थी स्वतःच्या क्षमता, बलस्थाने ओळखून त्यांना मिळणाऱ्या संधींचा उपयोग करत स्वतःच्या चुकांमधून शिकतील. विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकात लागणारे कौशल्य शिकत स्वतःमधील क्षमतांचा ते संपूर्ण विकास करू शकतील. हा उपक्रम 50 तासांचा प्रायोगिक अभ्यासक्रम असून त्यामध्ये विद्यार्थी अनुभवांमार्फत शिकतील. आत्मविश्वास, आत्मजागरूकता, जिद्द आणि स्वतंत्र निर्णय क्षमता या चार मानसिकतांचा विकास या अभ्यासक्रमातून केला जाईल. शिकवण्याचे आणि शिकण्याचे आधुनिक तंत्र हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

आयुष्यात अनेक अडचणींवर मात करून स्वतःची स्वप्ने साकार व्यक्तिमत्वांशी ‘लाईव्ह अंत्रप्रन्युरल इंटरॅक्शन’ या उपक्रमामधून विद्यार्थी संवाद साधू शकतील. उपक्रमामध्ये निदेशकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. यामध्ये त्यांना शिकवण्याच्या नवनवीन तंत्रांची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येईल.

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, तरुणांना स्वतःला व्यक्त होण्याची संधी देणे आणि त्यांना उद्योजक होण्याच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्याकरीता विविध औद्योगिक क्षेत्रे तसेच योजना तयार केल्या आहेत. या उपक्रमांतील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम-सीएमईजीपी) या योजनेचा उपयोग होईल आणि जिल्हापातळीवर विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये रोजगार मिळताना दिसेल. भविष्यामध्ये हा उपक्रम राज्यातील सर्व आयटीआय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उद्यम लर्निंग फाउंडेशनचे संस्थापक मेकिन महेश्वरी म्हणाले की, महाराष्ट्रातील आयटीआयची विद्यार्थ्यांमधील कौशल्ये घडवण्यात खूप महत्त्वाची भूमिका आहे. उद्यमच्या उपक्रमातून या कौशल्यांना पाठबळ देणाऱ्या मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये आम्ही विकसित करू पाहत आहोत. हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या आसपासच्या परिस्थितीला तटस्थपणे बघत स्वतः नवनिर्मिती करण्यास सक्षम बनवेल, असे त्यांनी सांगितले.