बोरोदेवी मंदिर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरा

devi
अनेक चित्रविचित्र परंपरा म्हटले, की भारतातील काही मंदिरांचे नाव प्रामुख्याने चर्चिले जाते. जळत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालण्यापासून मंदिराच्या छतावरून तान्ह्या अर्भकाला खाली फेकण्यापर्यंत, प्राण्यांचा बळी देण्यापासून भाविकांच्या डोक्यावर नारळ फोडण्यापर्यंत अनेक चित्र विचित्र परंपरा भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहावयास मिळतात. भारतामध्ये ज्याप्रमाणे अनेक संस्कृतींची विविधता आहे, त्याचप्रमाणे या निरनिराळ्या संस्कृतींचा भाग असणाऱ्या परंपरांमध्ये ही वैविध्य पहावयास मिळते.
devi1
याच प्राचीन परंपरांना अनुसरून भारतातील अनेक मंदिरांमध्ये प्राण्यांचे बळी, मद्य, केस इत्यादी गोष्टी देवतेला अर्पण केल्या जात आल्या आहेत. पण भारतामध्ये एक मंदिर असे ही आहे, जिथे केवळ मानवी रक्त देवतेला अर्पण केले जाण्याची प्रथा कैक शतकांपासून येथे चालत आली आहे. कूचबिहारमधील बोरोदेवी मंदिरामध्ये ही परंपरा देवीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने पाचशे वर्षांहूनही जुनी असल्याचे म्हटले जाते. दर नवरात्रामध्ये अष्टमीला मंदिराचे दरवाजे बंद करून येथे गुप्त पूजा करण्यात येत असून, मानवी रक्त देवतेला अर्पण करण्याची परंपरा आहे. मानवी रक्त देवतेला अर्पण केल्याविना पूजा सफल होऊ शकत नसल्याची मान्यता येथे आहे. इतकेच नव्हे तर या पूजेमध्ये कसलीही बाधा येऊ नये यासाठी दोन चौकीदार ही पूजा समाप्त होईपर्यंत मंदिराच्या बाहेर तैनात असतात.
devi2
या मंदिराशी निगडित आख्यायीकेच्या अनुसार कूचबिहार राज्याची स्थापना करणाऱ्या राजा बिस्व सिंह यांना मदनमोहन मंदिरामध्ये असलेली कामरूपाची मूर्ती आसाम मध्ये सापडली. त्यानंतर या मूर्तीची स्थापना मदन मोहन मंदिरात करण्यात असून, कामरूपाच्या आशीर्वादानेच कूचबिहारच्या राज्यामध्ये भरभराट आणि संपन्नता आल्याची स्थानिक लोकांची मान्यता आहे. तेव्हापासून खास दुर्गा पूजेच्या पर्वानिमित्त कामरूपाची मूर्ती बोरोदेवी मंदिरामध्ये आणली जाते. या काळामध्ये देवतांचे दर्शन घेण्यासाठी आसाम आणि त्रिपुरामधून भाविक मोठ्या संख्येने बोरोदेवी मंदिरामध्ये येत असतात.
devi3
प्राचीन काळी बोरोदेवीला नरबळी दिला जाण्याची प्रथा होती. पण कालांतराने सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी कूचबिहारचे तत्कालीन राजे महाराजा नारायणन यांना त्यांच्या खासगी सल्लागारांनी ही प्रथा बंद करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नरबळीची प्रथा बंद झाली असली, तरी या प्रथेचे प्रतीक म्हणून मंदिराचे पुजारी आपल्या हाताला सुईने टोचून घेऊन तीन थेंब रक्त देवाला अर्पण करू लागले. तेव्हापासून आजतागायत दर नवरात्रामध्ये अष्टमीच्या दिवशी ही प्रथा मोठ्या श्रद्धेने पाळली जात आली आहे.

Leave a Comment