जगामध्ये आजवर उकल न झालेली अशी अनेक अद्भुत रहस्ये आहेत. यांपैकी प्रत्येकाची कहाणी रोचक तर आहेच, पण तितकीच गूढही आहे. अमेरिकेमधील वॉशिंगटन जवळ वॅसहॉन आयलंड्स नामक एक ठिकाण आहे. याच ठिकाणाशी निगडित आहे ‘वॅसहॉन बाईक ट्री’चे रहस्य. येथे असलेल्या एका भव्य वृक्षाच्या बुंध्यामधून एक सायकल आरपार गेलेली आहे. ही सायकल इथे कशी आली, कोणी ठेवली याबद्दल अनेकांचे अनेक कयास आहेत. यामध्ये सर्वात प्रसिद्ध आख्यायिका अशी, १९१४ साली एका लहान मुलाने आपली सायकल या झाडाला बांधून ठेवली. त्यानंतर काहीच दिवसांत त्याला युद्धामध्ये सहभागी होण्यसाठी जावे लागल्याने आपली सायकल घेण्यासाठी हा मुलगा कधी परतलाच नाही. तर आणखी एका आख्यायिकेच्या अनुसार ही सायकल १९५०च्या काळातील असून डॉन पुझ नामक आठ वर्षाच्या मुलाने ही सायकल येथे ठेवली होती. मात्र ही सायकल त्याला काहीशी नापसंत असल्याने ही सायकल घेण्यासाठी परतण्याचे कष्ट डॉनने घेतले नाहीत, आणि तेव्हापासून ही सायकल येथेच पडून असल्याचे म्हटले जाते.
काही वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये एके दिवशी अचानक ‘देवदूतांच्या केसांची’ बरसात सुरु झाली. पांढऱ्या शुभ्र कापसाच्या पुंजक्याप्रमाणे दिसणारे हे तंतू आकाशातून खाली पडू लागले. अशीच घटना १९५४ साली फ्रांसमध्येही घडली होती. त्याकाळी हे तंतू नेमके कुठून आले होते याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्याने हे कदाचित परग्रहावरून युएफओच्या माध्यमातून पृथ्वीवर आले असतील असा काहींचा अंदाज होता, तर काहींनी या घटनेला थोडेसे आध्यात्मिक वळण देत आकाशातून देवदूतांचे केस पृथ्वीवर पडत असल्याचे म्हटल्याने या तंतूंना ‘एंजल्स हेअर’, म्हणजेच देवदूतांचे केस म्हणून संबोधले जाऊ लागले. मात्र हे तंतू जमिनीवर पडण्याअगोदरच हे हवेमध्येच विरघळून गेले असल्याने वैज्ञानिकांना यांचे विशेल्षण करणे अद्याप शक्य झाले नसल्याचे समजते. त्यामुळे हे एंजल्स हेअर नक्की आहेत तरी काय हे अद्याप न उकललेले गूढ आहे.
२१ मे १९९२ साली कॅराकॅस, व्हेनेझुएला येथे अचानक एक चार्टर्ड विमान उतरले. हे विमान येत असल्याची कोणतीही पूर्वकल्पना विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना नव्हती, कारण तशी पूर्वसूचना वैमानिकांकडून मिळालेली नव्हती. जेव्हा विमानतळावरील अधिकारी विमानाच्या जवळ पोहोचले, तेव्हा त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. हे विमान पॅन अमेरिकन एअरलाईन्सचे फ्लाईट 914 हे विमान असून, या विमानाने २२ जुलै १९५५ साली न्यूयॉर्क हून मायॅमीला जाण्यासाठी उड्डाण केले होते, व त्यानंतर हे विमान अचानक गायब झाले होते. या विमानाचे, त्यामधील प्रवाशांचे काय झाले याचा कोणताच थांगपत्ता लागू शकला नव्हता, आणि आता हे विमान परतले होते, ते देखील तब्बल ३७ वर्षांच्या नंतर ! सर्वात धक्कादायक गोष्ट अशी, की या विमानामध्ये सर्व यात्रेकरू उपस्थित होते. हे सर्व तेच यात्रेकरू होते, जे १९५५ साली या विमानातून प्रवास करण्यासाठी निघालेले होते, पण या यात्रेकरुंमध्ये ३७ वर्षांच्या नंतरही कोणतेच परिवर्तन घडून आलेले नव्हते. ना कोणाच्या चेहऱ्यांवर वाढत्या वयाच्या खुणा होत्या, ना त्यांचे कपडे बदलले होते !तब्बल ३७ वर्षे कुठलाही मागमूस न ठेवता गायब झालेले हे विमान त्यावरील ५७ प्रवासी आणि चार क्र्यू मेंबर्ससहित परतले, ते कसे, हे आजही न सुटलेले कोडे आहे.