हे आहे जगातील सर्वात मोठे कपाट

almarihi
इजिप्त देशामध्ये जगातील सर्वात मोठे कपड्यांचे कपाट बनविण्याचा विक्रम अलीकडेच केला गेला आहे. हे कपाट तब्बल सत्तावीस फुट उंचीचे असून, कॅलिफोर्नियाचा निवासी असणाऱ्या एका बत्तीस वर्षीय डिझायनरने ही करामत करून दाखविली आहे. या कपाटामध्ये तीन हजारांपेक्षाही जास्त कपडे ठेवले जाऊ शकत असल्याचे या डिझायनरचे म्हणणे आहे. हे कपाट बनविण्यासाठी बारा हजार पाऊंड खर्च करण्यात आले असून, भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे साडे दहा लाख रुपये इतकी आहे. हे कपाट स्टीलचा वापर करून बनविले गेले असून या कपाटाच्या निर्माणासाठी सुमारे सहा हजार किलो स्टील वापरले गेले असल्याचे समजते. त्याचप्रमाणे १८० मीटर स्टीलच्या तारेचा वापरही हे कपाट बनविण्यासाठी करण्यात आला आहे. सध्या इजिप्तमधील कैरो शहरातील काहिरा मॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले हे कपाट नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून ‘फोर्ब्स’च्या वतीने हे कपाट जगातील सर्वात मोठे कपाट असल्याचे घोषित करण्यात आले आहे. एक व्यक्ती आयुष्यभर घालू शकेल इतके कपडे या कपाटामध्ये सहज मावत असल्याचे या कपाटाच्या डिझायनरचे म्हणणे असल्याचे समजते.

Leave a Comment