ही आहे वाराणसीची सुप्रसिद्ध ‘टमाटर चाट’

chatt
भारताचे आधात्मिक केंद्रस्थान म्हणून वाराणसीची ओळख आहे. या शहरामध्ये सुमारे दोन हजारांच्यावर लहान मोठी मंदिरे असून, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली गंगामाई आणि काशी विश्वेश्वराचे मंदिरही याच ठिकाणी आहे. हे ठिकाण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे आहेच, पण त्याशिवाय एक आगळी खाद्यसंस्कृती या ठिकाणची खासियत आहे. वाराणसी येथे मिळणारे ‘स्ट्रीट फूड’ अतिशय लोकप्रिय असून, येथे मिळणारी दीना चाट भांडारची ‘टमाटर चाट’ येथील खासियत म्हणायला हवी.
chatt1
सुमारे सत्तर वर्षांपूर्वी दीनानाथ केसरी नामक एका युवकाने वाराणसीच्या लक्सा बाजारामध्ये ‘टमाटर चाट’ विकण्यास सुरुवात केली. हा पदार्थ वाराणसी वासियांसाठी नवा नसल्याने हा लवकरच लोकप्रिय झाला. काही काळातच ही चाट इतकी लोकप्रिय झाली, की त्यापासून होत असलेल्या कमाईच्या बळावर दीनानाथ केसरी यांनी लवकरच आपले छोटेसे दुकान सुरु केले. पाहता पाहता चाटची लोकप्रियता वाढली, एक दुकानाची दोन दुकाने झाली. आज इतके वर्षांच्या नंतरही या चाटची लोकप्रियता स्थानिक रहिवाश्यांमध्ये कायम आहेच, पण त्याशिवाय वाराणसी पाहण्यासाठी आलेले पर्यटक देखील ही चाट चाखण्यासाठी आवर्जून येथे येत असतात.
chatt2
दीनानाथ केसरी यांच्या कल्पकतेने अस्तित्वात आलेली ‘टमाटर चाट’ बनविण्याची पद्धत आजही केसरी कुटुंबीयांनी जपलेले गुपित आहे. ही पद्धत इतरांना माहिती पडू नये याची पुरेपूर काळजी गेल्या तीन पिढ्यांनी घेतली आहे. सुरुवातीला दिनानाथ केसरी ही चाट मातीच्या भांड्यांमध्ये विकत असत, व ही चाट बनविण्यासाठी वापरले जाणारे मसाले ही स्वतःच तयार करीत असत. आजच्या काळामध्ये दिनानाथ यांच्या पुढील तीनही पिढ्यांनी ही परंपरा सांभाळली असून, टमाटर चाट आजही पूर्वीप्रमाणेच मातीच्या भांड्यांमध्ये दिली जात असून याचे मसाले देखील केसरी कुटुंबीय स्वतः तयार करीत असतात. या चाटसाठी तयार करण्यात येणारी ग्रेव्ही बनविण्यासाठी काही तासांचा अवधी लागत असून, यामध्ये असलेल्या सुकामेवा, मोहोरीचे तेल, साजूक तूप, लिंबाचा रस आणि गूळ व या सर्व वस्तूंच्या जोडीला खास मसाले यांच्या मिश्रणाने या ग्रेव्हीचा स्वाद लाजवाब ठरत असतो. याच कारणास्तव ही खास टमाटर चाट वाराणसीमध्ये इतरत्र उपलब्ध जरी असली, तरी याची अस्सल चव मात्र दिना चाट भांडार मध्ये मिळणाऱ्या टमाटर चाटमधेच असल्याने याची लोकप्रियता आजही टिकून आहे.

Leave a Comment