मानवी मनाला घाबरविणारे असे ही काही फोबिया.

phobia
आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती असते. पण काहींच्या बाबतीत त्यांच्या मनातली एखाद्या गोष्टीची भीती इतकी जास्त असते, की क्वचित प्रसंगी ती त्यांच्यासाठी प्राणघातक देखील ठरू शकते. अशा प्रकारच्या भीतीला मानसशास्र्ण ‘फोबिया’ म्हणते. अंधाराचा फोबिया, किंवा उंच डोंगरांचा फोबिया, एखाद्या प्राण्याचा फोबिया, पाण्याचा फोबिया असे निरनिराळे फोबिया आपल्याला परिचित असले, तरी या व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे फोबिया अस्तित्वात आहेत. अशा काही असामान्य फोबियांच्या बद्दल जाणून घेऊ या.
phobia1
‘हिलियोफोबिया’ ही एखाद्याला सूर्यप्रकाशाची वाटणारी भीती असते. हा फोबिया असलेली व्यक्ती सूर्यप्रकाशामध्ये जाण्याचे अजिबात टाळते. सूर्यप्रकाशामुळे वंचित राहिल्याने या व्यक्तींच्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आढळून येते. ‘ऑईकोफोबिया’ असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये विद्युत उपकरणांची भीती असते. अशा व्यक्तींना घरामध्ये सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या विद्युत उपकरणांची देखील भीती वाटते. अनेक व्यक्तींना ‘सोम्नीफोबिया’ असतो. अशा व्यक्तींना झोप लागण्याची भीती असते. या व्यक्तींना झोप लागल्यानंतर कायम भयाण स्वप्न पडत असल्यामुळे आणि एकदा झोप लागली, की पुन्हा कधीच जाग येणार नाही अशी भीती मनामध्ये असल्याने झोपण्याचीच भीती या व्यक्तींना वाटत असते.
phobia2
ज्या व्यक्तींना ‘डेन्ड्रोफोबिया’ असतो, त्यांना वनराईची किंवा घनदाट झाडीची भीती वाटते. तर ‘नोमोफोबिया’ असणाऱ्या व्यक्तींना स्वतःच्या फोनपासून लांब राहण्याची भीती वाटते. अशा व्यक्ती आपल्या फोन पासून, किंवा इतरांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक उपकरणांपासून काही काळ जरी लांब राहिल्या तरी त्या अतिशय अस्वस्थ होतात. ज्यांना स्नानाची जीवघेणी भीती वाटते अशा व्यक्तींना ‘अब्लुटोफोबिया’ असतो, तर ज्यांना भाज्यांची भीती वाटते अशा लोकांच्या फोबियाला ‘लाशानोफोबिया’ म्हटले जाते. अनेक व्यक्तींना नदीवरील पूल पायी किंवा वाहनामध्ये बसून ओलांडण्याची भयंकर भीती वाटते. या फोबियाला ‘जेफिरोफोबिया’ म्हटले जाते. काही व्यक्तींना इतर कुठल्याही व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्पर्शाची भीती वाटते. याला ‘हॅपहेफोबिया’ म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment