अवश्य भेट द्या उदयपुर येथील ‘सास-बहु’ मंदिराला

temple
भारत देशामध्ये अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. यामधील अनेक मंदिरांच्या मागे असणारा इतिहास मोठा रोचक आहे. असाच रोचक इतिहास असणारे एक मंदिर राजस्थान येथील उदयपूर येथे आहे. या मंदिराला ‘सास-बहु’ मंदिर या नावाने ओळखले जाते. दहाव्या शतकाच्या काळादरम्यान या दोन्ही मंदिरांचे निर्माण करविण्यात आले. ‘सास’, म्हणजेच सासूचे मंदिर, ‘बहु’च्या, म्हणजेच सुनेच्या मंदिराच्या मानाने काहीसे मोठे असून, ही दोन्ही मंदिरे अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेली आहेत.
temple1
या ‘सास-बहु’ मंदिरांमध्ये एका मंचावर त्रिमूर्ती, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या प्रतिमा आहेत, तर दुसऱ्या मंचावर राम, बलराम आणि परशुराम यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मेवाड घराण्याच्या राजमातेने भगवान विष्णूच्या मंदिराचे निर्माण करविले असून, राजमातेच्या स्नुषेने शेषनाग मंदिराचे निर्माण करविले, म्हणूनच या मंदिराला ‘सास-बहु’ मंदिर म्हटले जाते. या मंदिरांच्या भिंतींवर महाभारताची संपूर्ण कथा शिल्परूपाने अंकित असून, या मंदिरातील स्तंभांवर शिव-पार्वतींच्या प्रतिमा आहेत. विशेष गोष्ट अशी, की आजच्या काळामध्ये या मंदिरांच्या गर्भगृहांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती नाहीत.
temple2
‘सास बहु’ मंदिरांमध्ये विष्णूची ३२ फुट उंच आणि २२ फुट रुंद अशी भगवान विष्णूची सहस्रबाहू मूर्ती असल्याने या मंदिराला सहस्रबाहू मंदिर या नावाने ही ओळखले जाते. ‘सास’ आणि ‘बहु’ मंदिराच्या मध्ये ब्रह्माचे लहानसे मंदिर आहे. जेव्हा मुघलांनी मेवाडवर आक्रमण केले तेव्हा रेती आणि चुन्याच्या भिंती उभारून या मंदिराचे प्रवेशद्वार बंद करविण्यात आले. त्यानंतर जेव्हा हा प्रांत इंग्रजाच्या अधिपत्याखाली आला, तेव्हा हे मंदिर पुन्हा खुले करण्यात आल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment