ही आहेत जगातील अद्भुत चित्रपटगृहे

theater
सुट्टीचा दिवस आला, किंवा साप्ताहिक सुट्टी असली, की आपल्यापैकी अनेकांचे पाय आपोआपच चित्रपटगृहांकडे वळतात. ज्याप्रमाणे चित्रपटांचे स्वरूप गेल्या काही दशकांपासून नित्याने बदलत आहे, त्याचप्रमाणे चित्रपटगहांचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वीच्या काळी अगदी साधीसुधी दिसणारी चित्रपटगृहे आताच्या काळामध्ये एकदम अद्ययावत झाली आहेत. तिथे बसण्याच्या खुर्च्यांपासून ते साऊंड सिस्टम पर्यंत प्रत्येक वस्तू अद्ययावत आहे. हे झाले सर्वसामान्य चित्रपटगृहांचे, पण जगातील काही ठिकाणी अशीही चित्रपटगृहे आहेत, जी याही पेक्षा कितीतरी वेगळी, अद्भुत आहेत.
theater1
ग्रीसमधील ‘ऑलिम्पिया थियेटर’ १९१० साली बनविले गेले. आता या थियेटरचे आधुनिकीकारण करण्यात आले असून, या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना चक्क प्रत्येकी एक पलंग दिला जातो. या पलंगावर पहुडून चित्रपटांचा आनंद प्रेक्षक घेऊ शकतात. तर मॉस्को येथे असलेल्या ‘आईकीया बेडरूम सिनेमा हॉल’मध्ये तुम्हाला चक्क तुमच्या बेडरूममध्ये बसून चित्रपट पहिल्याचा आभास होतो. या सिनेमागृहामध्ये खुर्च्या नाहीतच, तर प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा आरामात झोपून चित्रपट पाहण्यासाठी आलिशान पलंग येथे पुरविण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या सुविधेसाठी येथे
ब्लँकेट्स, पायांमध्ये घालण्यासाठी सपाता आणि बेडच्या कडेला एक लहानसा टेबल लॅम्पही पुरविण्यात येतो.
theater2
लंडन येथील नॉटिंग हिल येथे असणारे चित्रपटगृह येथील प्राचीन चित्रपटगृहांपैकी एक आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी आरामदायक सोफे ठेवण्यात आले आहेत. तर इंडोनेशियातील जकार्ता येथे असणाऱ्या ‘वेल्वेट क्लास’ चित्रपटगृहामध्येही प्रेक्षकांसाठी आलिशान पलंग ठेवण्यात आले आहेत. लंडन येथील हॉट टब सिनेमामध्ये गरम पाण्याच्या टबमध्ये डुंबत प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पेयांचा आस्वादही या ठिकाणी घेता येतो. पाण्यामध्ये तरंगत असणाऱ्या नावेमध्ये बसून चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला पॅरिस येथील ‘मूव्ही थियेटर’मध्ये जावे लागेल, तर बीन बॅगस् मध्ये बसून चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल तर मलेशियातील ‘बीन बॅग थियेटर’मध्ये फेरफटका मारावा लागेल.

Leave a Comment