हिऱ्यांच्या दागिन्यांपासून मसाल्यांपर्यंत, या सुप्रसिद्ध मार्केट्समध्ये मिळते सर्व काही

market
भारतातील काही राज्यांमध्ये असलेली मार्केट्स अतिशय लोकप्रिय असून, हे बाजार येथे उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमुळे खास आहेत. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या बारीक सारीक वस्तूंपासून ते अगदी हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध असणाऱ्या या बाजारपेठा काहीशा ‘हटके’ म्हणता येतील. मणिपूर येथील ‘इमा केइथल’ बाजार देशातील सर्वात प्राचीन बाजारपेठांपैकी एक असून, हा बाजार सोळाव्या शतकापासून भरत आला आहे. त्याशिवाय या बाजारपेठेची आणखी एक खासियत अशी, की या बाजारामध्ये मिळणाऱ्या वस्तूंची विक्री केवळ महिला विक्रेत्यांद्वारे केली जाते.
market1
आसाम येथील ‘जोनबील मेला’ भारतातील बहुधा अशी एकमेव मोठी बाजारपेठ आहे, जिथे आजच्या काळामध्येही ‘बार्टर सिस्टम’च्या मार्फत व्यापार केला जातो. म्हणजेच ग्राहकाकडे असलेल्या एखाद्या वस्तूच्या बदल्यामध्ये त्याला दुसरी वस्तू विकत घेता येते. या बाजारामध्ये सर्वसामान्य जनतेबरोबरच आदिवासी ग्राहक आणि विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी होताना पहावयास मिळतात. उत्तर प्रदेशातील विजय कन्नौज मार्केट ही अनेक तर्हेच्या सुगंधी अत्तरांची बाजारपेठ असून, येथे आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या तऱ्हेच्या सुगंधाची अत्तरे उपलब्ध आहेत. अगदी पहिल्या पावसानंतर दरवळणाऱ्या ओल्या मातीच्या सुगंधापासून ते अनेक दुर्मिळ फुलांच्या सुगंधांपर्यंत सर्व सुगंध अत्तराच्या रूपात येथे उपलब्ध आहेत.
market2
मुंबईच्या चोर बाजारामध्ये अँटीक फर्निचर, प्राचीन, दुर्मिळ शोभेच्या वस्तूंची रेलचेल पहावयास मिळते, तर राजधानी दिल्ली येथील ‘खडी बावली’ ही बाजारपेठ मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सर्व प्रकारचे मसाल्याचे पदार्थ उपलब्ध असून, जगभरामध्ये अतिशय दुर्मिळ असणारे ‘एक्झॉटिक’ मसाले देखील येथे उपलब्ध आहेत. ही बाजारपेठ आशियातील सर्वात मोठी मसाल्यांची होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. सुरत येथील महीधरपुरा डायमंड मार्केट ‘ओपन एअर जेमिंग’ साठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच येथे ग्राहक दुकानांमध्ये येऊन त्यांच्या गरजेनुसार हिऱ्याची खरेदी करू शकतात. गेली कैक वर्षे या बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या रत्नांची विश्वासार्हता मोठी असल्याने येथे हिरे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

Leave a Comment