आता पिझ्झा, बर्गरपेक्षा बिर्याणी होत आहे अधिक लोकप्रिय

biryani
आताचा काळ हा ‘मिलेनियल्स’चा आहे. या नव्या काळामध्ये रुजलेल्या अनेक नव्या पद्धतींमध्ये सकाळच्या चहापासून ते मधल्या वेळेच्या भुकेसाठी काहीतरी खाऊ ते अगदी जेवणापर्यंत सर्व पदार्थ ऑनलाईन मागविणे ही पद्धत रूढ झालेली आहे. पिझ्झा, बर्गर या पदार्थांना सातत्याने मागणी असतेच, पण आता या पदार्थांच्या इतकीच, किंबहुना या पदार्थांपेक्षा अधिक ऑनलाईन मागणी सध्याच्या दिवसांमध्ये गरमागरम बिर्याणीची असलेली पहावयास मिळत आहे.
biryani1
२०१७-१८ सालच्या मानाने गेल्या वर्षभरामध्ये बिर्याणीच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. अन्नपदार्थ घरपोच पोहोचविणाऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स पैकी स्वीगीने बिर्याणीची मागणी तब्बल ६८१ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले असून, सरासरी दर ३.८ सेकंदांनी बिर्याणीची मागणी होत असल्याचे म्हटले आहे. मागील वर्षामध्ये पिझ्झा, बर्गर, केक्स या पदार्थांची मागणी खूप जास्त होती, तर चिकन बिर्याणीची मागणी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी, सणावारांच्या निमित्ताने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनासाठी अधिक असल्याचे स्वीगी तर्फे सांगण्यात आले.
biryani2
बिर्याणीची वाढती मागणी पाहून ‘बिर्याणी हाउस’ सुरु करण्याला ‘फूड स्टार्टअप्स’मध्ये गुंतवणूक करणारे व्यापारी अधिक प्राधान्य देत आहेत. बिर्याणीचा दर सर्वसाधारणपणे किलोच्या प्रमाणे निश्चित केला जात असून, यामध्ये हैद्राबादी, लखनवी, कलकत्ता, मलाबारी, बॉम्बे, अवधी आणि तिहारी बिर्याणींचे प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अगदी मोठमोठ्या हॉटेल्स पासून ते लहान ‘क्विक सर्व्ह रेस्टॉरंट्स’, ‘क्लाऊड किचन्स’, आणि ‘टेक अवे’ जॉईन्स्ी इथपर्यंत सर्वत्र बिर्याणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.
biryani3
बिर्याणी ही नेहमी किलोच्या घरात मिळत असल्याने, व त्याची किंमतही रास्त असल्याने, जास्त लोकांसाठी भोजन मागावयाचे झाल्यास ग्राहकांना हा पर्याय सोपा वाटण्याबरोबरच यामध्ये उपलब्ध असलेल्या अनेकविध प्रकारांमुळे ग्राहकांना व्हरायटी देखील मिळत असल्याने हा पदार्थ जास्त लोकप्रिय होत आहे. बिर्याणीची लोकप्रियता आता खूपच वाढली असून हा पदार्थ आता केवळ काही ठराविक ठिकाणांपुरता मर्यादित न राहता जवळजवळ संपूर्ण देशभरातच सहज उपलब्धही होऊ लागला आहे. त्यामुळेच बिर्याणी प्रेमींनी आतापासून २८ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय बिर्याणी दिवस म्हणून घोषित केला आहे.

Leave a Comment