टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या वक्तव्यावर ठाम


डेहरादून – मागील दोन-तीन दिवसांपासून देशभरात उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे नाव गाजत आहे. रावत यांनी फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर त्यावरून सर्वच स्तरांतून टीका झाली. रावत यांनी टीकेचे धनी ठरल्यानंतरही आपली भूमिका कायम ठेवली आहे. वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना, आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला आपला कायमच विरोध असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना तीरथ सिंह रावत यांनी हे वक्तव्य केले होते. ज्याचे पडसाद देशभरात उमटले. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला आपला कायम विरोध असल्याचे म्हटले. महिलांनी जीन्स वापरण्याला माझा विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.