राखी सावंतकडून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे समर्थन


झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बेंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. यावर प्रतिक्रिया देत झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने म्हटले की त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. कामराजला या महिलेनेच मारहाण केली. यावेळी तिच्या हातातील अंगठीच तिच्या नाकाला लागली आणि रक्त येऊ लागल्याचे कामराजचे म्हणणे आहे. तर महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचा आरोप केला होता.

आता अनेक सेलिब्रिटींनी याप्रकरणी बाजू मांडायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानंतर राखी सावंतने डिलिव्हरी बॉयचे समर्थन केले आहे. राखीने मीडियाशी बोलताना डिलिव्हरी बॉय कामराजसोबत घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राखी म्हणाली कि, माझ्या घरी येणाऱ्या सर्व डिलिव्हरी बॉयला मी पाणी प्यायचे आहे का विचारते. कारण कोरोना काळातही ते आपल्यासाठी काम कर आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी पोस्ट केलेल्या राखी सावंतच्या एका व्हिडीओत तिने काही चाहत्यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. राखीने त्यानंतर या झोमॅटो डिलिव्हरी बॉय प्रकरणावर वक्तव्य केले आहे.


राखी सावंत म्हणाली, त्या डिलिव्हरी बॉयसोबत अन्याय झाला. याचे मला खूप वाईट वाटत आहे. मित्रांनो झोमॅटोवाले किंवा डिलिव्हरीवाले तुमच्या घरी तुमचे पोट भरावे म्हणून येतात. त्यांचा आदर करा. त्यांना प्रेमाने वागणूक द्या. सगळीकडे कोरोनाची भीती असतानाही ते नोकरी करत आहेत. मी असे म्हणत नाही कि त्यांना जेवायला द्या, पण किमान त्यांना एक ग्लास पाणी तरी त्यांना पाजा. मी नेहमी त्यांना पाणी देते, असे राखी सावंत म्हणाली आहे.

राखी सावंत पुढे म्हणाली कि, त्यांना थोडा आदर आणि प्रेम आपण देऊच शकतो. यासाठी आपल्याला टॅक्स तर भरावा लागत नाही. कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राखी सावंतने यंदा डिलिव्हरी बॉयची बाजू घेतली आहे. परिणीती चोप्रानेदेखील नुकतेच एक ट्विट करत या डिलिव्हरी बॉयची चूक नसल्याचे म्हटले होते. यावरुन तरुणीची बाजू घेत परिणितीला अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुनावले होते.