कृषीपंप वीज जोडणी धोरणाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद


मुंबई : नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत 5.82 लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंप विजबिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम भरली आहे. प्रलंबित वीजजोड प्रकरणी तात्काळ कार्यवाही आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या या नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाची आखणी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे.

कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या 511 कोटी 26 लाख रकमेवर 256 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण 5 लाख 82 हजार 114 शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे.

राज्यातील 44 लाख 44 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 789 कोटी रुपयांची थकबाकी आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणानुसार विलंब आकार आणि व्याजातील एकूण सूट 15 हजार 93 कोटी रुपये इतकी असून सुधारित होणारी थकबाकी 30 हजार 696 कोटी रुपये होते. पहिल्या वर्षी भरल्यास सुधारित मूळ थकबाकीपैकी अर्धी म्हणजेच सुमारे 15 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम माफ होणार आहे. अशा प्रकारे एकूण 30 हजार कोटी रुपयापेक्षा अधिकची भरीव सूट थकबाकीदार कृषिपंप धारकांना मिळणार आहे.

या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असून महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे. हे लाभ देऊन सुधारित करण्यात आलेल्या सप्टेंबर, 2020 च्या देयकातील सुधारित मूळ थकबाकीवर पहिल्या वर्षी भरल्यास 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे.

दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे तुलनेत पहिल्याच वर्षी थकबाकी भरल्यास मोठा लाभ होणार असून कृषिपंप ग्राहक थकबाकीमुक्त होण्यास मदत होईल.

गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

‘महा कृषी ऊर्जा पर्व’ अंतर्गत होळ (ता. बारामती) या ठिकाणी अभियान कार्यक्रमात मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते चंद्रकांत शिवलिंग महाजन (रा. होळ) यांनी शेती पंप कृषी बिल निरंक केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.