या दिवसापासून अनुभवता येणार ‘रात्रीस खेळ चाले 3’ मालिकेचा थरार


झी मराठी वाहिनीवरील गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका असणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. आता त्याच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून झी मराठी वाहिनीने एक पोस्टर शेअर केले आहे. अण्णा नाईक यांची बंदुक या पोस्टरमध्ये दिसत आहे. सोबतच पुन्हा गोळी सुटणार अण्णा नाईक पुन्हा येणार, असे त्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पण, अण्णा नाईक या भूमिकेने तर सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण केली आहे.

आता या दोन्ही भागांतील पात्र तिसऱ्या भागात कोणत्या रूपात आपल्याला भेटायला येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सगळ्या प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम पाहता या मालिकेचा तिसरा भाग आणण्याचा निर्णय झी मराठी वाहिनीने घेतला आहे. २२ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठी या वाहिनीवर या मालिकेचा तिसरा भाग हा पाहता येणार आहे.


झी मराठीने याआधी मालिकेतील तिसऱ्या भागाचा एक प्रोमो देखील शेअर केला होता. या प्रोमोमध्ये अण्णा नाईक भूत असल्याचे दिसत आहे. प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमके काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.