कोरोना लसीकरणात गरजूंना प्राधान्य देण्यात यावे; केंद्र-राज्य सरकारला आनंद महिंद्रांचे आवाहन


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यावर काळजी व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन केले आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम गरजूंना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे, की कोरोनाची लस गरजेनुसार देण्यात यावी, त्याला लागणाऱ्या सर्व परवानग्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. या वेळी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी, जेणेकरुन कमीत कमी लोकांमध्ये संक्रमण होऊ शकेल.


आनंद महिंदा पुढे म्हणाले की, सध्या देशात असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे राज्य देशाच्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र आहे. पुन्हा एकदा या राज्यात लॉकडाऊन लागल्यास आर्थिक स्थिती आणखी दुर्बल होऊन जाईल. आनंद महिंदा यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केले आहे.

आपल्या पुढच्या ट्विटमध्ये आनंद महिंदा म्हणतात की, कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आता लसीकरणाच्या कामात वेग घेणे गरजेचे आहे. आपण असे नाही केले तर आपल्याला नुकसान होऊ शकते. उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यामध्ये लसीकरण सेंटरची सुरुवात करण्याची परवानगी द्यावी.