केवळ दहा दिवस पुरेल एवढाच राज्यात कोरोना लसीचा साठा : राजेश टोपे


मुंबई : एकीकडे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीच्या वापरावरुन धारेवर धरलेले असतानाच, दूसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात केवळ दहा दिवस पुरेल एवढाच कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा असल्याचे म्हटलं आहे. आज प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाल्याचे ट्विट केल्यानंतर राजेश टोपे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील लसीकरणाची परिस्थिती सांगितली.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, लसीकरणावर राज्यात भर दिला जात आहे. राज्यात एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचे लसीकरण झाले आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचे लसीकरण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी कोरोना लसही तेवढ्यात प्रमाणात प्राप्त होणे गरजेचे आहे. साधारणपणे एक कोटींहून लोकांचे लसीकरण करायचे आहे. येत्या तीन महिन्यात दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोसची आवश्यकता आहे. काल मी स्वत: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून त्याची माहिती दिली आहे.