उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे महिलांच्या पोशाखावरुन वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी एका कार्यक्रमामध्ये महिला वापरत असलेल्या जीन्सवर वक्तव्य केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महिला आजकाल फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळे योग्य आहे का? हे कोणते संस्कार असल्याचे तीरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यशाळेचे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी याच दरम्यान बोलताना हे वक्तव्य केले आहे. तसेच मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात, असे देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी यावेळी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. मी एकदा विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितले की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. त्या महिलेला मी विचारले की कुठे जायचे आहे? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला.

जेएनयूमध्ये महिलेचा पती प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. त्यावेळी माझ्या मनात असा विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. आम्ही जेव्हा शाळेत होतो, तेव्हा असे नसल्याचेही रावत यांनी म्हटले आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावे लागेल. तसेच रावत यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावे लागेल, असे देखील म्हटले आहे. रावत यांनी काही दिवसांवपूर्वी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती.

मी कधीही उत्तराखंडचा मुख्यमंत्री होईन असा विचार केला नव्हता, अशी प्रतिक्रिया तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर दिली होती. मी आज तुमच्या आशिर्वादामुळे येथे पोहोचलो आहे. मी अतिशय लहान गावातून आलो आहे. मुख्यमंत्री होण्याचा विचारदेखील कधी केला नव्हता. माझ्याकडे देण्यात आलेली जबाबदारी तुमच्या सहकार्याने पूर्ण करेन. राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असे तीरथ सिंह रावत म्हणाले आहेत.