भारतात लसीकरण पूर्ण होण्यास लागणार १७ वर्षे?

करोना लसीकरण सर्वाधिक वेगाने सुरु असलेल्या जगभरातील देशात भारताच्घा दुसरा क्रमांक आहे मात्र ज्या वेगाने सध्या लसीकरण केले जात आहे त्याचा विचार केला तर देशातील सर्व १३६ कोटी नागरिकांना करोना लसीचा दुसरा डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यास १७ वर्षे लागतील असे सांगितले जात आहे. देशात करोनाचा पाहिला डोस २.७० कोटी नागरिकांना दिला गेला असून दुसरा डोस दिलेल्या नागरिकांची संख्या ५८.६७ लाख आहे. एकूण लोकसंख्येचा विचार केला तर हे प्रमाण अनुक्रमे २ व ०.४५ टक्के इतकेच आहे.

इस्रायलने ६० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन होत असूनही याच वेगाने लसीकरण झाले तर किमान १७ वर्षे लागतील. केंद्र सरकारांनी जुलै २०२१ पर्यंत किमान ५० कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे मात्र या वेगाने ते पूर्ण होणे अशक्य असल्याचे तज्ञांचे मत आहे.

आज जगभरात अमेरिकेत करोना लसीचे उत्पादन सर्वात जास्त असून त्याखालोखाल भारताचा नंबर आहे. अमेरिकेत ४.६९ अब्ज डोस उत्पादन होत आहे तर भारतात ३.१३ अब्ज डोस उत्पादन होत आहे. सर्वाधिक वापर फायझर बायोएनटेकच्या लसीचा होत असून ६१ देशात ही लस दिली जात आहे.

जगात ४१ देशात ऑक्सफर्ड अॅस्ट्रोजेनेकाच्या लसीचा तर २७ देशात मॉडर्नाच्या करोना लसीचा वापर होत आहे. १० देशात चीनच्या सिनोफार्म लसीला मान्यता आहे तर रशियाच्या स्पुतनिकला पाच देशात मान्यता मिळाली आहे. भारताची स्वदेशी कोवॅक्सीन फक्त भारतच दिली जात आहे.