कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लागू


मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावाचा प्रकोप राज्यात पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार पुन्हा एकदा काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्याचे आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ज्याचे पालन केले जाणे अपेक्षित आहे. राज्यात ही नवी नियमावली 31 मार्चपर्यंत लागू करण्यात आली आहे. ज्याचे पालन केले जाणे बंधनकारक आहे.

 • त्यानुसार सर्व प्रकारची सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल 50 टक्के कार्यक्षमतेने सुरु राहतील.
 • या ठिकाणी योग्य पद्धतीने मास्क न वारपणाऱ्यांस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाच्याच वेळी तापमानाची नोंद केली जाईल. योग्य त्या ठिकाणी सॅनिटायझरचा पुरेसा पुरवठा. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन योग्य पद्धतीने केले जात आहे की नाही हे पाहण्यासाठी माणसे नेमावीत.
 • हेच नियम विविध भागांमध्ये असणाऱ्या मॉलसाठीही लागू असतील.
 • एकाच ठिकाणी अनेक माणसे जमतील अशा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करु नये. या नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर ज्या वास्तूत या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, ती ठिकाणेही बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.
 • 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती लग्नकार्यांसाठी नसावी.
 • अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांचीच उपस्थिती असावी. यावर स्थानिक प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे.
 • एक तासात धार्मिक स्थळांवर किती लोक असणार याचे नियोजन करावे, त्यानुसारच दर्शन घेता येणार आहे.
 • दर्शनासाठी ऑनलाईन विजिटच्या पर्यायाला प्राधान्य देण्यात यावे.
 • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना वगळता सर्व कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थितीच अपेक्षित आहे.
 • वर्क फ्रॉम होम या पर्यायाला कार्यालयांनी प्राधान्य द्यावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन झाल्यास कार्यालयावर बंदीची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 • स्थानिक प्रशासनाला कोरोनाबाधितांबाबतची माहिती देण्यात यावी. तसेच या माहितीमध्ये सदर व्यक्ती कोणत्या डॉक्टरांकडून विलगीकरणात राहून उपचार घेत असल्याचाही समावेश असावा.
 • सदर व्यक्ती असणाऱ्या ठिकाणी एक फलक 14 दिवसांसाठी ठेवण्यात यावा. ज्यामध्ये येथे कोरोनानाबाधित रुग्ण असल्याची बाब नमूद असावी.
 • गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर त्यासंबंधीचा शिक्का असावा.
 • विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींनीही त्यांची बाहेर ये-जा नियंत्रणात ठेवावी. मास्करचा वापर आवर्जून करावा.
 • वरीलपैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्यास तातडीने रुग्णाला स्थानिक प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.