राज्यात कोरोनाचा प्रकोप कायम; आज दिवसभरात १७,८६४ नवे रुग्ण, ८७ मृत्यू


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून कोरोनाची राज्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. गेल्या २४ तासांत आज राज्यात १७ हजार ८६४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ कालच्या तुलनेत २ हजार ८१३ ने अधिक आहे. ही संख्या काल १५ हजार ०५१ एवढी होती. त्याचबरोबर गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या काल १० हजार ६७१ एवढी होती.

याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८१३ वर जाऊन पोहचली आहे आज राज्यात एकूण ८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ४८ एवढी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा आहे. आज राज्यात ९ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख ५४ हजार २५३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ टक्के एवढे झाले आहे.

१ लाख ३८ हजार ८१३ एवढी राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ हजार ८१७ इतरे रुग्ण आहेत, तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो १९ हजार ५५८ एवढा झाला आहे. हा आकडा मुंबई पालिका हद्दीत १३ हजार ८६२ एवढा झाल आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ६७७ एवढी आहे. ही संख्या अमरावतीत ३ हजार ७४३, औरंगाबादमध्ये ८ हजार ८७७, जळगावमध्ये ४ हजार ८४८, अहमदनगरमध्ये २ हजार ४७२ एवढी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४०३ एवढी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २३१ एवढी आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७७ लाख १५ हजार ५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख ४७ हजार ३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५२ हजार ५३१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.