तुमच्या भेटीक अण्णा नाईक परत येत हत!


‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेच्या तिसऱ्या सिझनची घोषणा झाल्यापासून ही मालिका कधीपासून सुरू होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

प्रेक्षकांना या मालिकेचे दोन्ही भाग प्रचंड आवडले. अगदी मालिकेतील पात्र आणि ही पात्र साकारणा-या कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. प्रेक्षकांचा मालिकेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता लवकरच ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तूर्तास या तिसऱ्या सीझनच्या प्रोमोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.


सध्या झी मराठीवर अण्णा नाईक परत येणार..असे प्रोमोज झळकत आहेत. त्यातच आता एक नवा प्रामो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईच्या लोकलमधील हा प्रोमो चांगलाच धडकी भरवणारा आहे. रात्रीच्या अंधारात लोकल धडधडत येते. प्रवासी लोकलमध्ये बसतात. आत पाहतात काय, तर डब्यात सर्वत्र अण्णा नाईक परत येणार…, असे लिहिलेले दिसते. प्रवासी याची खिल्ली उडवताना दिसतात. पण तितक्यात खिडकीत साक्षात अण्णा नाईक दिसतात. त्यांचा तो चेहरा पाहून सगळ्यांचीच बोबडी वळते.


‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या आणि दुस-या भागातील अनेक कलाकार या तिस-या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिस-या भागात एंट्री होणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता, तर दुस-या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत.