रशियन होळी ‘माल्सेनित्सा फेस्टिव्हल’ उत्साहात साजरा

रविवारी रशियात  १०२ वर्षे जुना ‘माल्सेनित्सा फेस्टिव्हल’ साजरा केला गेला. यावेळी ७८ फुट उंचीचे लाकडी घर जाळण्यात आले आणि मिठाई खिलवून उपस्थितांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या उत्सवाची यंदाची थीम ‘फेअरवेल ऑफ करोना’ अशी होती. जाळण्यात येणाऱ्या लाकडी महालाची सजावट मास्क लावून केली गेली होती. तसेच एक लसीकरण टॉवर ही उभारला गेला होता.

भारतात ज्या प्रमाणे होलिका दहन केले जाते त्याच धर्तीवर रशियात ‘माल्सेनित्सा फेस्टिव्हल’ साजरा होतो. वाईटाचे दहन आणि नव्याची सुरवात हीच कल्पना त्यामागे आहे. वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी हा उत्सव साजरा होतो आणि या काळात सर्व कुटुंबीय एकत्र वेळ घालवितात, पूर्वजांच्या आठवणी काढतात. जत्रा भरतात. जुन्या वस्तू जाळल्या जातात. आपली पापे जाळण्याचे ते प्रतिक मानले जाते.

जगात ५० हून जास्त देशात होलिका दहनसारखे उत्सव साजरे केले जातात. ब्रिटन मधील बॉनफायर फेस्टीव्हल, स्पेनचा मर्क, अमेरिकेचा बर्निंग मॅन, जपानचा वाकाकुसा यामायाकी किंवा माउंटन बर्निंग फेस्टिव्हल, व ग्वाटेमालाचा क्वेमा डेयाब्लो म्हणजे राक्षसाचा अंत हे त्यातील प्रमुख उत्सव आहेत.