अण्णाद्रमुकचे सरकार आल्यास वर्षाला ६ सिलेंडर मोफत, एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि मोफत डाटा


चेन्नई – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याबरोबरच जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले जात आहेत. तामिळनाडूत सध्या सत्ताधारी असलेल्या अण्णाद्रमुक पक्षानेही आपला जाहीरनामा घोषित केला. अण्णाद्रमुकने मतदारांवर या जाहीरनाम्यातून आश्वासनांचा पाऊसच पाडला आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना अण्णाद्रमुकने अनेक आश्वासने मतदारांना दिली आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास एका वर्षात राज्यातील प्रत्येक कुटुंबाला ६ सिलेंडर मोफत देण्यात येतील. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ करण्याचे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २जी डेटा मोफत देण्याचे वचनही अण्णाद्रमकने आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे. नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन आहार सुरू करण्याचाही समावेश जाहिरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे.

अण्णाद्रमुकने वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांना सध्या १ हजार रुपये पेन्शन मिळते, ती २ हजार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर तामिळनाडू उच्च न्यायालय असे नामांतर मद्रास उच्च न्यायालयाचे करण्याची आणि श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना देण्याच्या आश्वासनाचा समावेश जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करेल, असेही अण्णाद्रमुकने म्हटले आहे. आणखी एक महत्त्वाची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. मातृत्व रजा वाढवून एक करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, त्याचबरोबर अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यातून अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा केली आहे.