गृहमंत्रीपदी अनिल देशमुखच, जयंत पाटलांनी केले स्पष्ट


मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर आणि एकंदरीतच गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते.

खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच राजीनामा या प्रकरणात घेतला जाण्याची चर्चा सुरू झाली होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख व्यवस्थित कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नसल्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर बैठक होत असून यामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर ते थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी निघाल्यामुळे सरकारची बदनामी आणि नाचक्की टाळण्यासाठी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता जयंत पाटील यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएकडून सीआययूमधील त्यांचे सहकारी रियाज काझी यांची चौकशी सुरू आहे. त्यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. यामध्ये विरोधकांकडून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून त्यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सचिन वाझे, रियाज काझी हे अधिकारी थेट परमबीर सिंग यांच्या हाताखाली येत असल्यामुळे त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.