हद्दपार होणार २ हजारांची नोट ? मागील २ वर्षांत छापलेली नाही २ हजारांची एकही नोट


नवी दिल्ली – २०१६च्या नोव्हेंबर महिन्यात देशभरात नोटबंदी लागू झाली आणि चलनातील जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा हद्दपार करण्यात आल्या. त्यानंतर चलनात ५०० च्या नव्या नोटा आणल्या गेल्या आणि त्यासोबतच भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठे चलन म्हणून २ हजार रुपयांची नोट बाजारात आणली गेली.

मोठ्या नोटांची संख्या वाढल्यास त्यातून काळा बाजार वाढू शकतो, अशी देखील एक टीका नोटबंदीनंतरच्या निर्णयांवर केली जात होती. पण, नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होत आहेत की काय? असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती सभागृहाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. त्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये २ हजारांची एकही नोट गेल्या २ वर्षांत छापली नसल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार विशिष्ट किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सल्लामसलत करून घेत असते. यातून बाजारात नोटांच्या मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा ठेवता येतो. पण २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये २ हजारांची एकही नोट छापली गेली नसल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ३० मार्च २०१८रोजी २ हजार रुपयांच्या ३३६ कोटी २० लाख नोटा होत्या, हाच आकडा २६ फेब्रुवारी २०२१मध्ये २४९ कोटी ९० लाख नोटांपर्यंत खाली आल्यामुळे बाजारातून २ हजार रुपयांच्या नोटा कमी होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यापुढील काळात २ हजार रुपयांच्या नोटा छापल्या जाणार की नाही? याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही.