माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवा – वरूण सरदेसाईंचे नितेश राणेंना आव्हान


मुंबई – आज पत्रकार परिषदेत सचिन वाझे प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी देखील उत्तर दिले आहे. त्यांच्यासोबत यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांची देखील उपस्थिती होती. पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केले, हे सगळे आरोप हे तथ्यहीन असून त्या आरोपांमुळे आज मी आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करणार आहे. जे काही आरोप त्यांनी केले, हे त्यांनी सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला त्यांनी सामोरे जावे, असा इशारा वरूण सरदेसाई यांनी दिला आहे.

वरूण सरदेसाई पुढे म्हणाले, एका अतिशय सुसंस्कृत व उच्चशिक्षित कुटुंबातून मी येतो, मला राजकारणाची आवड असल्यामुळेच मी युवासेना आणि शिवसेनेचे काम करतो. जे काही घाणेरडे आरोप आज करण्यात आले आहेत, अशी काम करण्याची माझी इच्छा नाही व माझ्या हातून तसे घडणार देखील नाही. माझ्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली.

पण माझ्यावर ज्यांनी आरोप केले, त्या राणे कुटंबाची पार्श्वभूमी मला वाटते सर्वश्रुत आहेच. मग अगदी त्यांची ती सुरूवातीची गँग असो व नंतर त्यांच्यावर असंख्य अगदी गंभीर गुन्हे खून, अपहरण, खंडणी असे विविध गुन्हे त्यांच्या कुटुंबावर दाखल आहेत. या सगळ्याचा पाढा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत मांडला असून तो रेकॉर्डवर देखील आहे.

तसेच, मी माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगितली आहे, त्यांच्या कुटुंबाची माहिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोणी कोणावर कसले आरोप करावे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तसे तर संपूर्ण राणे कुटुंबीयांना बेछुट आरोप करायची सवयच लागली आहे. ते ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा असेच आरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केले आणि ते आज जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा, महाविकास आघाडीमधील विविध नेत्यांवर करत आहेत व गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत.

खरंतर महाराष्ट्रातील जनता आता या संपूर्ण राणे कुटुंबीयांना अजिबात गांभीर्याने घेत नाही, त्यांना भीक घालत नाही. त्यांची जेव्हा कधी पत्रकार परिषद होते, त्यांचे जेव्हा कधी एखादे विधान समोर येते किंवा ते जेव्हा टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर दाखवले जाते. त्याच्या खालच्या जर तुम्ही कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राची जनता त्यांना किती गांभीर्याने घेते, असे देखील यावेळी वरूण सरदेसाई यांनी बोलून दाखवले.