सचिन वाझेना १२ दिवसाची एनआयए कोठडी

मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ ते २५ मार्च अशी १२ दिवसांसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कोठडी मंजूर केली आहे. शनिवारी रात्री वाझे यांना एनआयएने अटक केली होती. त्यापूर्वी शुक्रवारी वाझे यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्या संदर्भातील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडल्याच्या प्रकरणात वाझे याना अटक केली गेली आहे. या संशयित स्कॉर्पिओच्या मागे एका इनोव्हा गाडीत वाझे यांना दोन वेळा पाहिले गेले होते. ही इनोवा गुन्हा अन्वेषण विभागाची असून त्याचा वापर वाझे करत होते. एनआयने ने या संदर्भात दोन ड्रायव्हर आणि दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याचे समजते. स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला वाझे जबाबदार असल्याचे आरोप मनसुख यांच्या पत्नीने केला असून तसा एफआयआर पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एटीएस कडे आहे.

वाझे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आणि विधानसभेत विरोधी पक्षाने जोरदार हंगामा केल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची बदली केल्याची घोषणा केली होती. दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी मुंबई पोलिसांच्या बदनामीचा हा प्रकार आहे, त्यांच्या अधिकारांवर आक्रमण केले जात असून केंद्रीय तपास यंत्रणेची गरजच नसल्याचे म्हटले आहे.