तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी कशासाठी प्यावे?

copper-vessel
काही दशकांपूर्वी स्टेनलेस स्टीलची भांडी अस्तित्वात आली, आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरातील तांब्या-पितळ्याची चमक हरवून गेली. पूर्वीच्या काळी सर्रास वापरली जाणारी तांब्या-पितळ्याची भांडी आता क्वचित प्रसंगीच बाहेर दिसू लागली. स्टेनलेस स्टील आल्यापासून सतत घासून तांब्याची भांडी चमकविण्याचे व पितळ्याच्या भांड्यांना कल्हई करून आणण्याचे महिलांचे कष्ट आपोआपच कमी झाले. रोजच्या वापरातून तांब्या-पितळ्याची भांडी दूर झाली खरी, पण तांब्याच्या भांड्यांमध्ये रात्रभर साठविलेले पाणी पिण्याचे महत्व आजच्या काळामध्ये ही टिकून आहे. ही पद्धत केवळ भारतातच नाही, तर आजच्या काळामध्ये जगभरामध्ये लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर भरून ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी पिण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेऊ या.
copper-vessel2
तांबे हा लालसर रंगाचा धातू शरीरासाठी गुणकारी मानला गेला आहे. शरीरामध्ये याच्या कमतरतेमुळे अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात, तसेच हॅमरॉइड्स, हायपोक्रोमिक अनिमिया, शारीरिक थकवा, नैराश्य, व्हाईट ब्लड सेल्सच्या संख्येत कमी अश्या प्रकारच्या नानाविध समस्या देखील तांबे किंवा कॉपरच्या कमतरतेने उद्भवू शकतात. तांबे या धातूचे महत्व प्राचीन आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. या तत्वांना आताच्या काळामध्ये ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने देखील मान्यता दिली असून, हा धातू शरीरातील अनेक अवयवांना सक्रीय ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले जाते. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी शरीरातून घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते, पचनक्रिया चांगली ठेवते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविते व त्वचेचे सौंदर्य वाढविते.
copper-vessel1
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तांब्यामध्ये साठविलेले पाणी थोडे थंड राहतेच, त्याशिवाय या धातूचा अंश या पाण्यामध्ये उतरला असल्याने या पाण्याच्या सेवनाने शरीरातील कफ, वात आणि पित्त हे तीनही दोष नियंत्रणात राहतात. त्याचप्रमाणे ज्यांना वारंवार अॅसिडीटीचा त्रास होत असेल, त्यांच्यासाठी देखील हे पाणी पिणे फायद्याचे ठरते. पोटामध्ये वारंवार गॅसेस होत असल्यास, बद्धकोष्ठ किंवा जुलाब होत असल्यासही या पाण्याच्या सेवनाने आराम मिळतो. ज्यांना पेप्टिक अल्सरची समस्या असेल किंवा ज्यांच्या आतड्यांना काही कारणाने सूज येत असेल त्यांच्यासाठी देखील या पाण्याचे सेवन लाभदायक आहे. ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांच्यासाठी देखील हे पाणी उत्तम आहे. या पाण्याच्या सेवनाने शरीरातील चरबी कमी होते.
copper-vessel3
तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी नियमित सेवन केल्याने शरीरावरील कोणत्याही प्रकारचे घाव लवकर भरून येतात. तसेच या पाण्याच्या सेवनाने शरीरामध्ये नवीन, निरोगी कोशिका सातत्याने तयार होत असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. तांब्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मुबलक मात्रेमध्ये असल्याने वाढत्या वयाच्या खुणा, या पाण्याच्या नियमित सेवनाने टाळता येतात. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील या पाण्याचे सेवन उत्तम समजले जाते. तांबे ‘अँटी कार्सिनोजेनिक’ तत्वांनी परिपूर्ण आहे, म्हणजेच या धातूच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी कर्करोगप्रतिकारक आहे. या पाण्याच्या नियमित सेवनाने मेंदू सक्रीय राहतो, तसेच थायरॉईड ग्रंथीचे कार्य ही सुरळीत राहते. ज्यांना अनिमिया आहे त्यांनी ही तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेल्या पाण्याचे सेवन नियमित करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment